Friday, March 6, 2020

Navegavachi Gangadevi story in Marathi

महती देवीची : नवेगावची गंगादेवी

नागपूरपासून आंभोरा मार्गावर मांढळपासून तीन किमी दूर असलेल्या नवेगावातील गंगादेवी मंदिर जागृत स्थान  समजले असून या मंदिराला ४०० वर्षांचा इतिहास आहे. चैत्र आणि आश्विन महिन्यात होणाऱ्या देवीच्या नवरात्रात या ठिकाणी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिराच्या इतिहासाबाबत बोलताना मंदिराचे प्रमुख कृष्णा कढव यांनी सांगितले, ज्या ठिकाणी मंदिर आहे तो पूर्वी भोसलेकालीन परिसर होता. तेथे फक्त देवीची मूर्ती होती. मूर्तीवर कुठलेही शेड नव्हते. मात्र, ७५ वर्षांपूवी त्या भागात पडझड झाली होती त्यामुळे त्या भागातील घरे आणि मंदिर उध्वस्त झाली मंदिर जसेच्या तसे राहिले. नंतर मंदिराची डागडुजी करून भाविकांसाठी सोय करण्यात आली. श्रीमंत राजे भोसले या मंदिरात येत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. ब्रिटीशांच्या काळात भिवानी भगत देवीच्या मंदिराची पूजा व तेथील व्यवस्था पहात होते. भिवानी भगत हे सिद्ध पुरूष होते. स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांना ब्रिटिशांनी अटक केली होती. रातोरात दैवीशक्तीने उमरेडच्या जेलमधून ते बाहेर आले आणि देवीच्या मंदिरात जाऊन बसले, अशी आख्यायिका आहे. मध्यंतरीच्या काळात मंदिरात पडझड झाली होती. अंधश्रद्धा आणि बुवाबाजीचे प्रकार या भागात मोठय़ा प्रमाणात वाढू लागले होते.
१२ ऑक्टोबर १९९५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला आहे. गंगादेवीची मूर्ती स्वयंभू आहे की त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली याचा उल्लेख मात्र कुठेच नाही. चारशे वर्षांपेक्षा जास्त इतिहास या देवी मंदिराला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला त्यावेळी कोणाकडून आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती पण मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम होत गेले आणि आज या ठिकाणी प्रशस्त असे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर कलश आणि मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी महालक्ष्मी याग आयोजित करण्यात आला होता. मंदिरात गेल्या तीन वर्षांपासून देवी भागवत सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, जिल्ह्य़ातील अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. येथे २००८ मध्ये शतचंडी याग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आजूबाजूच्या गावातील ५० हजारापेक्षा अधिक भाविक उपस्थित होते. नवरात्र उत्सवात मंदिरात दररोज भजन कीर्तन आणि महाप्रसाद आयोजित केला जातो. सकाळी ७ वाजेपासून कुही, मांढळ, आंभोरा या परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिरात गेल्या अकरा वर्षांपासून उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मंदिरात बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत ग्रामीण भागातील एक हजारावर त्याचा लाभ घेतला आहे. ह.भ.प. बारई महाराज या मंदिरात विविध उपक्रम राबवत असतात. या शिवाय अमृत दिवाण गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवले जातात. नुकतेच गो-ग्राम यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या परिसरात येणाऱ्या काळात धर्मशाळा, गो शाळा आणि संस्कार शिबिरासाठी सभागृह बांधण्याचा मानस असल्याचे कृष्णा कढव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Please do write your suggestions and thoughts.