Friday, March 6, 2020

Mohadichi Maa Chaundeshwari story in Marathi

महती देवीची : मोहाडीची माँ चौंडेश्वरी


भंडारा जिल्ह्य़ात भंडारा-तुमसर राजमार्गावरील मोहाडी या तालुक्याच्या गावी माँ चौंडेश्वरीचे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान असल्याची लोकश्रद्धा आहे. मोहाडी परिसराचे हे आराध्यदैवत आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे नवरात्र महोत्सव होत असून केवळ विदर्भच नाही तर, मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील भाविक महोत्सवात माँ चौंडेश्वरीच्या दर्शनाला येतात. मुख्य घटाव्यतिरिक्त मंदिर परिसरात यावर्षी ९३२ घटांची स्थापना झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या ७७८ होती. विजयादशमीला महाप्रसाद होतो. परिसरातील ३०-३५ हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. व्यवस्थापन मंदिर-समिती तसेच, नवदुर्गा विद्यार्थी युवक मंडळाकडे असते. नवरात्रात येथे यात्रेचे स्वरूप येते.  यात्रेत चांगलाच बाजार भरतो. मोहाडीच्या पश्चिमेला माँ चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. या परिसराला टेकडी म्हटले जाते. टेकडी परिसराला तीर्थक्षेत्र गायमुखवरून निघालेल्या गायमुख नंदीने विळखा घातला असून परिसर वनराईसदृश्य झाडाझुडुपांनी निसर्गरम्य केला आहे. नवरात्रीतील रोषणाईने तो आणखीच उजळून दिसतो.
प्राचीन काळी गायमुख नदी व दाट वनराई असलेल्या या तपोवनात महाचंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. यज्ञाच्या आवर्तनासाठी दूरदुरून ऋणीमुनी आले होते. यज्ञसामुग्री संपली. ठराविक मंत्रोच्चारही संपले. ऋणीमुनींनी वेदमंत्र म्हणायला प्रारंभ केला. चारही वेदांनी केलेले स्तवन ऐकून हवनकुंडातून गर्जना करत महाचंडीचा चेहरा बाहेर आला. साधना करणाऱ्यांची मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वचन तिने दिले. चारही वेदांनी केलेल्या स्तवनाने देवी प्रसन्न झाली म्हणून तिला ‘चौवेदेश्वरी’ हे नाव पडले. पुढे अपभ्रंश होऊन ते ‘चौंडेश्वरी’ झाले. याच कथेचे अन्य कथानक म्हणजे, यज्ञसाहित्य संपल्यामुळे ऋषिमुनींनी बाजूला ठेवलेल्या ग्रंथरूपातील ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्व वेदाताचे एकेक पान हवनकुंडात टाकले आणि प्रसन्न होऊन देवी प्रकट झाली.
कनोज प्रदेशातील रेणू राजाची कामेष्टीय यज्ञाच्या अग्नीतून निघालेली कन्या रेणुका हिने जसे अपत्य वात्सल्यातून भूगर्भातून मस्तक वर काढून पुत्र परशुरामाला दर्शन दिले अशाच शक्तीरूप देवता महाराष्ट्रात डोंगर पहाडावर प्रकटल्या. त्यांना कुठे रेणुका, कुठे योगेश्वरी, कुठे महालक्ष्मी, कुठे दुर्गा नाव मिळाले. अशीच कथा माँ चौंडेश्वरीची आहे. माँ चौंडेश्वरीचा फक्त भव्य चेहरा जमिनीवर आहे. तिचे डोळे, नाक, कान, मुख दिसते.
टेकडी परिसरात माँ चौंडेश्वरीची मूर्ती उघडय़ावर होती. संत नारायण स्वामी नावाचे भक्त पूजाअर्चा करत. पुढे स्वामी कुटुंबात कोणी उरले नाही. ब्रिटीश काळात लहानसे मंदिर उभारले गेले. त्यानंतर आधुनिक काळात भक्तांनी देवस्थान मोठे केले. उत्पन्न येत गेले. देवस्थानाचा विस्तार होत गेला. सुंदर बगीचा, धर्मशाळा, सभोवताल भिंत, उंच जागेचे सपाटीकरण झाले. देवदेवतांचे विस्तारीकरणही झाले. सोबतीला शिरडीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, शंकर भोलेनाथ, गणेशाची स्थापना झाली. एका लहान मंदिरात नारायण स्वामींच्या पादुका ठेवण्यात आल्या. विविध स्पर्धानाही आता प्रारंभ झाला आहे. मंदिराच्या उत्पन्नातून धर्मार्थ दवाखाना, अ‍ॅम्ब्युलन्स, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, असे विविध सामाजिक उपक्रमही पुढे राबवले जाऊ शकतात.
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचे एकत्रीकरण म्हणजे आदिमाया किंवा जगदंबा. तिचेच एक रूप म्हणजे माँ चौंडेश्वरी. अलंकारांनी मढवलेल्या देवीचे आकर्षक डोळे नागपूर शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे कला तज्ज्ञ तसेच, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सन्मानित प्रा. प्रमोद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली तयार             करण्यात आले. त्यामुळे माँ चौंडेश्वरीचे गोजरे विलोभनीय रूप अधिक आकर्षक झाले आहे.

No comments:

Post a Comment

Please do write your suggestions and thoughts.