Friday, March 6, 2020

Maa Saraswati Devi Mandire Story in Marathi

सरस्वती शारदादेवीची मंदिरे

तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका माता या देवींची मंदिरं आपल्याला माहीत असतात.


तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका माता या देवींची मंदिरं आपल्याला माहीत असतात. पण याबरोबर आपल्या देशात काही ठिकाणी सरस्वतीची मंदिरेही होती, आहेत. त्यांचा आढावा

सरस्वतीचा स्वतंत्र असा संप्रदाय नाही आणि ही देवी कुणाचीही कुलदैवत वा परंपरागत आराध्य दैवत असल्याचे ऐकिवात नाही. अश्विनी नवरात्र, कार्तिक शुक्ल पंचमी (ज्ञानपंचमी) व माघ शुक्ल पंचमी (वसंत पंचमी) असे वर्षांतील काही निवडक दिवस सरस्वतीच्या वाटणीला आलेले आहेत. या तिथीला तिची पूजा करतात. त्या निमित्ताने पाटीपूजन, पुस्तकांची पूजा होते आणि मुलांना शाळेत घालण्याचा समारंभही पार पडतो; पण वर्षांतील या तिथी सोडता, देवीची नित्य पूजा इतर देवांप्रमाणे फारशी प्रचलित नाही. त्यामुळे साहजिकच सरस्वतीला धार्मिक वा लौकिकदृष्टय़ा फारशी लोकप्रियता लाभली नाही. परिणामत: तिची प्रतिष्ठापना मंदिरात मर्यादित स्वरूपात झाली आणि सरस्वती ही मुख्य वा प्रधान देवता असलेली फार थोडी स्वतंत्र मंदिरे बांधली गेली. त्यांपैकी आजमितीस हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीसुद्धा मंदिरे अवशिष्ट नाहीत. अलीकडे विसाव्या शतकात काही सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे बांधण्यात आली आहेत.

आज अवशिष्ट असलेल्या मंदिरांत आद्य शंकराचार्य (इ. स. ७८८-८२०) यांनी स्थापन केलेल्या सरस्वतीच्या – शारदेच्या शृंगेरी येथील मंदिराविषयी एक आख्यायिका आहे. शारदा पूर्वजन्मी ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती होती. तिला दुर्वास ऋ षींच्या शापामुळे भूलोकी जन्म घ्यावा लागला. तिचा विवाह मंडनमिश्र या विद्वान पंडिताशी झाला. शंकराचा अवतार शंकराचार्य यांचे दर्शन झाल्यामुळे ती शापमुक्त झाली आणि निजधामी जाण्यास निघाली. तेव्हा शंकराचार्यानी तिला विनंती केली की, तिने शृंगेरी इथे वास्तव्य करून भक्तजनांची सेवा घ्यावी. तिने ती विनंती मानली आणि शृंगेरीला जाऊन तुंगा नदीत जलसमाधी घेतली. तिचा आत्मा सत्यलोकी गेला आणि पार्थिव देह तिथेच शिलारूपात राहिला. शंकराचार्यानी त्या शिळेवर चक्र कोरले आणि शारदेची चंदनमूर्ती बनवून तिची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. तिला शारदांबा म्हणतात. ती शृंगेरीच्या शारदा मठाची उपास्य देवता आहे. पुढे विद्यारण्यांनी शारदा मंदिर बांधले. त्या वेळी त्यांनी शारदेच्या काष्ठमूर्तीच्या जागी पंचलोह विग्रह धातूची मूर्ती प्रतिष्ठित केली. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात गर्भगृह, सभामंडप (महामंडप) आणि प्राकार  आहे. हे मंदिर द्राविड वास्तुशैलीचा उत्तम नमुना असून त्याला तीन दरवाजे आहेत. थोडय़ा उंचीवर बांधलेला महामंडप भव्य असून त्याचे छत दोन स्तंभ रांगांवर आधारित आहे. त्या स्तंभांवर देव-देवतांच्या मूर्तीचे नक्षीकाम आहे. प्राकारातील  देवळांत गणपती आणि भुवनेश्वरी यांच्या सुबक मूर्ती आहेत. मंदिरात अनेक धार्मिक समारंभ संपन्न होतात. त्यांपैकी आश्विन महिन्यातील शारदोत्सव धूमधडाक्याने साजरा करण्यात येतो. मंदिरात अभिषेक, पूजाअर्चा आणि धूपदीपनैवेद्यादी धार्मिक विधी व उपचार नियमित चालू असतात.

22-lp-devi
कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्हय़ात धारवाडच्या पूर्वेस सुमारे ६७ कि.मी.वर गदग हे व्यापारी शहर वसले आहे. या शहराचा प्राचीन कन्नड व संस्कृत साहित्यांतून तसेच काही शिलालेखांतून क्रतुक, क्रतुपूर, कर्डुगू, गलडुगू, गडुगू इत्यादी भिन्न नावांनी उल्लेख आढळतो. शहरात वीरनारायण, सोमेश्वर, त्रिकुटेश्वर आणि सरस्वती ही चार प्रमुख व प्राचीन मंदिरे आहेत. त्यांपैकी त्रिकुटेश्वर व सरस्वती ही दोन मंदिरे गदगच्या दक्षिण भागात एकाच प्रांगणात बांधलेली आहेत. सरस्वतीचे मंदिर त्रिकुटेश्वर मंदिरापेक्षा आकाराने लहान असून ते त्रिकुटेश्वराच्या दक्षिणेस पूर्वाभिमुख बांधले आहे; तथापि आकाराने लहान असूनसुद्धा कलाकुसरीचा नाजूकपणा आणि अलंकरण यांमुळे ते उठून दिसते. मंदिराचे वास्तुविधान चतुरस्र असून उघडा मुखमंडप अणि गर्भगृह एवढाच मंदिराचा भाग अवशिष्ट आहे व शिखर पडले आहे. प्रांगणात सापडलेल्या पश्चिम चालुक्य राजा दुसरा आहवमल्लदेव  (कार, १०६८- १०७६) याच्या कोरीव लेखत सरस्वती मंदिराच्या देखभालीसाठी दान दिल्याचा उल्लेख आहे, त्यावरून हे मंदिर तत्पूर्वी केव्हा तरी चालुक्य राजांनी बहुधा आहवमल्लदेवाचे पिताजी सोमेश्वर आहवमल्ल यांनी बांधले असावे. मुखमंडपातील अठरा स्तंभांवर नाजूक अलंकरण असून चालुक्य शिल्पकलेचा आविष्कार त्यांतून दिसतो. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले दोन स्तंभ विशेष कलात्मक आहेत. स्तंभांवरील अलंकरणात लहान देवळ्या, छोटे स्तंभ, देवदेवतांच्या छोटय़ा प्रतिमा, त्यांचे सेवक, सिंह, शरभादी व्याल व इतर भौमितिक आकृतिबंध आहेत. हे शिल्पांकन उठावात असून यांतील देवदेवतांनी विविध प्रकारची आभूषणे घातली आहेत. मुखमंडपाचे आयताकार छत साधे असून त्याच्या मध्यभागी कमळकलिकात उत्फुल्ल कमळ कोरले आहे. सरस्वतीच्या अवशिष्ट प्राचीन मंदिरांत सुस्थितीत असलेले कदाचित हे एकमेव मंदिर असावे.

या मंदिराच्या गर्भगृहात उंच पीठावर मोरावर कमळात अर्धपर्याक आसनात विराजमान झालेली सरस्वतीची मानवी आकाराची (सु. पाच फूट चार इंच) पूर्णाकार मूर्ती आहे. या ठिकाणी देवी चतुर्भुज असून तिचे चारही हात कोपरापासून तुटलेले आहेत; परंतु तिची घडण अत्यंत नाजूक व सफाईदार आहे. तिने सुरेख तलम वस्त्र परिधान केले असून तिचे कुरळे केस करंड मुकुटातून बाहेर आलेले दिसतात. तिच्या अंगावर बाजुबंद, कुंडले आणि गळ्यात रत्नाहार व माळा आहेत. तिची मेखला नक्षीदार असून तीत रत्ने आहेत.

चोल वंशातील विक्रम चोल (कार. १११८-११३५) राजाच्या पदरी ओत्तकुठर नावाचा एक विद्वान कवी होता. तो सरस्वतीचा मोठा भक्त; त्याला आपली प्रतिभा व बुद्धी ही सरस्वतीची कृपा व देणगी आहे, असे मनोमन वाटे, तो ‘वरकवी’ (श्रेष्ठकवी) म्हणून दरबारात ख्यातनाम होता. त्याने राजाचा मुलगा दुसरा कुलोत्तुंग (कार. ११३३-११५०) आणि त्याचा मुलगा दुसरा राजराजा यांना शिकविले होते. अशा प्रकारे तीन पिढय़ांचा तो राजगुरू होता. सरस्वतीची निरंतर सेवा घडावी म्हणून त्याने अरसिलर नदीकाठी सरस्वतीचे मंदिर बांधण्याची इच्छा चोल राजाकडे केली. चोल राजाने त्याच्या विनंतीचा मान राखून सरस्वतीचे एक मंदिर तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात कुंभकोणम- करईक्कल रस्त्यावरील मथिलदुथुरई गावाजवळ कुथनूर या ठिकाणी अरसिलर नदीकाठी बांधले. कुथनूरला अम्बपुरी असेही म्हणतात. चोल राजांच्या बाराव्या शतकातील एका शिलालेखात ओत्तकुठरने मंदिर बांधल्याचा उल्लेख असून ओत्तकुठरला त्याच्या सेवेसाठी अग्रहार दिल्याची नोंद त्यात आहे. त्याच्या ‘तक्कयगपरणी’ या तमिळ भाषेतील काव्यात सरस्वतीचा उल्लेख त्याने पुढील शब्दांत ‘अयंगरई सोल किलयी’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला असून त्याचा भावार्थ ‘जी नदीकाठी वास करते’ असा आहे. यावरून कुथनूरच्या मंदिरासंबंधीच तो बोलत असावा हे निश्चित. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील इ. स. १४९२ च्या कोरीव लेखात कोणा पुरुषोत्तम नावाच्या सधन गृहस्थाने मंदिराची डागडुजी व जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे.

या मंदिराचे बांधकाम चोल वास्तुशैलीत इ. स. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले असावे, हे नक्कीच!  या भव्य मंदिराचे गर्भगृह, अर्धमंडप, सभामंडप, वाहनमंडप, योगशाळा असे भाग असून सभोवती प्राकार  आहे. आणि मुख्य प्रवेशद्वारावर गोपूर बांधलेले आहे. गर्भगृहात सरस्वतीची अप्रतिम चतुर्भुज पाषाणमूर्ती असून देवी उत्फुल्ल कमलासनात बसलेली आहे. तिच्या वरच्या दोन्ही हातांत (उजवा- डावा) अनुक्रमे अक्षमाला व देठासह कमळ आहे आणि खालच्या दोन हातांपैकी उजवा अभय मुद्रेत असून डाव्या हातात पोथी आहे. देवीचे वाहन हंस वा मयूर कोठेच दिसत नाही;  मात्र मुखाच्या मागे भिंतीवर कमळ खोदलेले आहे. आश्विन महिन्यातील विजयादशमीला ‘सरस्वती पूजा’ हा समारंभ मोठय़ा थाटाने केला जातो. त्या दिवशी शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना मूळाक्षरांची दीक्षा मंदिरात दिली जाते. म्हणून ही सरस्वती या ठिकाणी ‘ज्ञान सरस्वती’ या नावाने पुजली जाते. या ठिकाणी भक्तांना स्वत: पूजा करण्याची मुभा असून देवीच्या पायापासून अर्धमंडपापर्यंत फुलांचा सडा त्या वेळी घातलेला दिसतो.

सरस्वतीचा उल्लेख नंतरच्या वेदोत्तर साहित्यातून अनेक वेळा ‘शारदा’ असा केलेला आढळतो. बाराव्या शतकातील कल्हण (बारावे शतक) या काश्मिरी ग्रंथकाराच्या मते शारदादेवीची पूजाअर्चा काश्मीरमध्ये नित्यनेमाने हेत होती. तिचे मंदिर श्रीनगरच्या आग्नेयेस तख्त- इ- सुलेमान पर्वतश्रेणीच्या समेटाजवळच्या उंच अशा एका आयताकार पठारावर बांधलेले होते. आणि त्याला ६४ पायऱ्या होत्या. त्या चौसष्ट कलांच्या द्योतक होत. ‘राजतरंगणी’त कल्हण हे मंदिर गोपादित्य राजाने बांधल्याचे सांगतो आणि शारदेच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भक्त मधुमती व सरस्वती नदीचे दर्शन घेतात व ज्यांची कवींनी शब्दपूजा बांधली आहे, त्यांना वंदन करतात. काश्मीर हा प्रदेश प्राचीन काळापासून सरस्वतीच्या भक्तांचा प्रदेश असल्यामुळेच, या मंदिरास शारदापीठ किंवा शारदामंडळी असेही म्हणत. अल्-बीरुनी (इ. स. ९७३-१०४८) हा प्रवासी सिंधूच्या उत्तरेकडील खोऱ्यातील गिलगीट आणि लडाख या जम्मू- काश्मीर प्रदेशातील शारदेच्या अवशिष्ट मंदिराविषयीचा उल्लेख आपल्या वृत्तांतात (अल्- बीरुनीज इंडिया- सचाऊ) करतो. बिल्हण (अकरावे शतक) या काश्मिरी कवीने आपल्या ‘विक्रमांकदेवचरिता’त येथील शारदेविषयी लिहिले आहे. तो शारदेच्या हंस या वाहनाची तुलना मधुमतीच्या चकाकणाऱ्या सुवर्ण मुकुटाशी करतो. आद्य शंकराचार्यानी या शारदेचे दर्शन घेतले होते, अशी कथा आहे. विद्यमान मंदिरास शंकराचार्य मंदिर म्हणतात. त्या ठिकाणी आज शिवलिंग आहे, मात्र सरस्वती वा शारदेची मूर्ती आढळत नाही. किंवा तशा पुरातत्त्वीय खुणाही दिसत नाहीत. जोनराज या इतिहासकाराच्या मते मुसलमान नबाब झैन- उलू- अबिदिन (इ. स. १४२०-१४७०) याने एकदा शारदा मंदिराला भेट दिली होती आणि तेथील पावित्र्य नष्ट केले. सोळाव्या शतकातील अकबराच्या दरबारी असलेल्या अबुल – फज्ल (इ. स. १५५१-१६०२) या इतिहासकाराने ‘आईन – इ – अकबरी’ या त्याच्या ‘अकबरनामा’ ग्रंथाच्या तिसऱ्या भागात या ‘शारदा’ मंदिराचा उल्लेख केला आहे. त्यावरून हे मंदिर सोळाव्या शतकाअखेर अवशिष्ट वा अस्तित्वात असावे, हे निश्चित!

लंडन (इंग्लंड) मधील ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात धार (धारानगरी, मध्य प्रदेश) येथील परमार भोज (इ. स. १०००-१०५५) याने घडवून घेतलेली अभिलिखित वाग्देवी सरस्वतीची एक सुरेख मूर्ती आहे. भोज राजाने धारानगरीत अनेक मंदिरे बांधली. त्यांपैकी विद्यादेवी सरस्वतीचे मंदिर आणि भोजनशाळा (विद्यामंदिर)प्रसिद्ध होते. यातील सरस्वतीच्या मूर्तीच्या पादपीठावर पुढील मजकूर खोदला होता –

‘‘श्रीमद् भोज नरेन्दचन्द्रनगरी विद्याधरी..

वाग्देवी प्रतिमाम् विधाय जननी यस्या जितानाम् त्रयी..

फलाधिकाम् धरसरिन् मूर्ती सुभां निर्ममे इति शुभं..

सूमधार सहिर सुत मनथलेन घटितं विटिक शिवदेवेन लिखितं इति संवत १०९१’’

त्याचा थोडक्यात अर्थ असा – भोजाच्या धारानगरीत, कामना पूर्ण करणारी फलाधिकाम अशा वाग्देवीची पवित्र मूर्ती सहिर या प्रसिद्ध शिल्पीचा मुलगा मनथल याने घडविली असून त्या मूर्तीच्या पादपीठावरील लेख शिवदेव याने संवत १०९१ मध्ये कोरला आहे. म्हणजे ही मूर्ती इ. स. १०३५ मध्ये भोज राजाच्या कारकिर्दीत घडविली आहे. ही वाग्देवी चतुर्भुज असून पादपीठावर त्रिभंग आसनात ती उभी आहे. तिचे वरचे हात सुस्थितीत असून खालचे कोपरापासून तुटले आहेत. तिच्या करंडमुकुटाच्या दोन्ही बाजूंस आकाशगामी विद्याधारांच्या मूर्ती असून पायाजवळ एक सेवकाची मूर्ती आहे; तसेच एक कुंभधारी बटूची मूर्ती आहे. तिने मोजकेच अलंकार घातले असून तिच्या कानातील झुमक्याप्रमाणे लोंबणारी नाजूक कुंडले तिच्या भरगच्च अंबाडय़ाच्या पाश्र्वभूमीवर खुलून दिसतात. तिच्या गळ्यात कंठा, मोत्याचा हार दोन्ही स्तनांमधून खाली बेंबीवर आला आहे. तिचे अधोवस्त्र नक्षीदार तीन साखळ्यांच्या कमरपट्टय़ाने बांधले आहे. आणि कमरपट्टय़ाच्या अन्य साखळ्या तिच्या भरदार पुष्ट मांडय़ांवर रुळल्या आहेत. तिने पायात चार तोडे व मासळ्या घातल्या आहेत. तिच्या मुखावर शांत भाव दिसत असून विद्वत्तेचे तेज आहे. या ठिकाणी सिंह हे तिचे वाहन आहे. सांप्रत या मंदिराचे फक्त पुरातत्त्वीय अवशेष आढळतात. आणि मूर्ती तर लंडनमधील ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात विराजमान आहे. मूर्तीच्या पादपीठावरील शिलालेखामुळे या मध्यमयुगीन वाग्देवी मंदिराची स्मृती जागृत आहे.

नित्यनियमाने पूजाअर्चा होत असलेले एक सरस्वती वा ज्ञान सरस्वतीचे मंदिर आदिलाबाद जिल्ह्यात (आंध्र प्रदेश) महाराष्ट्र आंध्र प्रदेशच्या सीमेवर बासर या लहान खेडय़ात आहे. या मंदिरामुळे बासर हे तीर्थक्षेत्र व यात्रास्थान झाले आहे. ते गोदावरी नदीकाठी वसले असून श्रीमद् व्यासमुनीनी या ठिकाणी सरस्वती देवीची स्थापना केली, अशी कथा स्थानिक लोक व भक्तगण साग्ांतात. गावातील वडिलधाऱ्या मंडळींच्या मते हे मंदिर शिवकाळानंतरचे पण पेशवाईपूर्व असावे. या ठिकाणी देवीची महासरस्वती, महाकाली व महालक्ष्मी ही तीन रूपे असून गर्भगृहात सरस्वतीची स्वतंत्र पाषाणमूर्ती आहे. गर्भगृहाव्यतिरिक्त एक सभामंडप आहे. त्यात सरस्वतीच्या पादुका आणि लहान पाषाणमूर्ती आहे. तीच मूर्ती लौकिकदृष्टय़ा सर्वाना पूजेसाठी खुली असते. पादुकांसमोर प्रसंगोपात विशेषत: विजयादशमीला (दसरा) पाटी- पेन्सिलची पूजा करून ती देवाला अर्पण करण्याची अभिनव प्रथा आहे. नंतर मुलांना प्रथम विद्यालयात धाडण्याचा परंपरागत परिपाठ आहे. मंदिराच्या आठ दिशानां इंद्र, व्यास, सूर्य, वाल्मीकी, विष्णू, गणेश, शिव आदी नावांची आठ तीर्थे आहेत. बासरला व्यासपुरी असेही म्हणतात व तेथील सरस्वतीला ‘ज्ञान सरस्वती’ देवी म्हणतात. गाभाऱ्यातील मूळ मूर्ती वालुकाश्मातील असून चतुर्भुज बैठी आहे. तिच्या हातांत अनुक्रमे पुढचा उजवा व मागील डावा वीणा धरली असून मागील उजव्या हातात पात्र व माला आहे. या देवी व स्थानाविषयी कोदुमगुळ्ळे परांकुशाचार्य यांनी लिहिलेल्या ‘श्री बासर ज्ञान सरस्वती माहात्म्य’ (१९९१) या पुस्तकात त्यासंबंधी सविस्तर माहिती दिलेली आहे.

राजस्थानात पुष्कर (अजमीर जिल्हा) या क्षेत्री ब्रह्मदेवाने कार्तिक शुद्ध ११ ला यज्ञ केला होता, असे ‘पद्मपुराणा’तील कथेतून आढळते. पुष्कर तीर्थ अजमीरच्या वायव्येस  सुमारे ११ किमीवर असून एकमेव ब्रह्मावतार ठिकाण आहे. येथे जुन्या मंदिराच्या ठिकाणी इ. स. १८०२ मध्ये नवीन मंदिर बांधल्याचे कर्नल जेम्स टॉड याने आपल्या राजस्थानवरील ‘अ‍ॅनल्स अँड अँटिक्विटीज ऑफ राजस्थान’ (annals and antiquities of rajasthan) या ग्रंथात लिहिले आहे. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराजवळ गायत्री व सावित्री या त्याच्या पत्नींची गर्भगृहवजा दोन स्वतंत्र मंदिरे आहेत. याशिवाय या ठिकाणी आणखी सरस्वती, बद्रीनारायण व वराह यांची मंदिरे आहेत. ही सरस्वतीची स्वतंत्र मंदिराव्यतिरिक्त छोटी गर्भगृहसदृश मंदिरे होत.

उत्तर प्रदेशातील मथुरा हे कृष्णजन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी द्वाराकाधीशाचे भव्य मंदिर असून यमुना नदीकाठी अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांतली देव – देवतांचे दर्शन- प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा होय. या मंदिरसमूहात पश्चिमेस एक टेकाड आहे. त्यावर सरस्वतीचे एक छोटे मंदिर आहे. त्याच्या पायथ्याला एक लहान ओढा वाहतो. त्याला सरस्वती नाला म्हणतात. आणि तेथील कुंडालाही  सरस्वती कुंड म्हणतात. याशिवाय याच भागात ‘हरे राम हरे कृष्ण’ पंथाचे संस्थापक गुरुवर्य श्री प्रभुपाद यांनी बांधलेले श्रीकृष्ण – राधा यांचे भव्य मंदिर आहे.  ते इस्कॉन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या आधुनिक मंदिरात हिंदू संप्रदायातील अनेक देवदेवतांच्या देवडय़ा आहेत. त्यांतली एका देवडीत सरस्वती देवीची एक संगमरवरी सुंदर मूर्ती आहे.

सिक्कीम येथे एक रुमटेक मठ आहे. त्या मठातील सरस्वतीच्या अप्रतिम शिल्पामुळे तो सरस्वती मठ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी देवी उत्फुल्ल कमळावर वीरासनात बसली असून कमळाची द्विदल पाकळ्यांची नक्षी फारच छान आहे. सरस्वतीची प्रभावळ कलात्मक असून त्यांतील कमळांची वर्तुळे व त्यांवरील अधरेन्मिलित कमळकलिकांचा रचनाबंध व त्या मधोमध खोदलेले कीर्तिमुख इत्यादी सर्व कलाकारी नजर रोखून धरते. देवी द्विभुज असून तिने डाव्या हातात कमळकलिका (त्याचा देठ तिच्या हातात आहे.) व उजवा अभयमुद्रेत असून त्यात अक्षमाला आहे. तिने मोजके अलंकार ल्याले असून त्यांतील कंकणे, मोत्यांचा कंठा व कर्णफुले स्पष्ट दिसतात. तिचा पद्ममुकुट व त्याच्या मोत्यांच्या माळा दोन्ही बाजूला कानावर पडल्या आहेत आणि माथ्यावर मधोमध कमळ आहे. तिने साडी नेसलेली असून तिच्या डाव्या स्तनावरून डाव्या बाहूवर लपेटलेला पदर इत्यादींतून साडीच्या चुण्या स्पष्ट दिसतात. तिच्या दोन्ही बाजूला सेवक आहेत. त्यांच्या माथ्यावर  पगडीसदृश शिरस्त्राण आहे. परस्पराकडे चोची केलेले दोन हंस तिच्या मांडीखाली खोदले आहेत. देवीच्या मुखावर प्रसन्न भाव असून स्मितहास्य आहे. तिचे डोळेसुद्धा या ठिकाणी बोलके वाटतात. कपाळावर मध्यभागी कुंकवाचा टिळा आहे. इ. स. १६ व्या शतकातील हे एक अत्यंत प्रमाणबद्ध, सडपातळ बांध्याचे लोभस शिल्प आहे.

तमिळनाडूतील तंजावर येथे दुसरा सरफोजी भोसले (इ. स.  कार. १७९८-१८३२) या कलाभिज्ञ व ग्रंथप्रेमी राजांनी ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ स्थापन केले. ते सरस्वती मंदिरसम असून यातील चित्रसंग्रहात सरस्वतीचे एक अप्रतिम रंगीत चित्र आहे. या ठिकाणी सरस्वती उत्फुल्ल पद्मासनावर सव्य ललितासनात उजवा पाय खाली सोडून डावी मांडी घालून लोडाला टेकून बसली आहे. ती चतुर्भुज असून वरचा उजवा हात ज्ञानमुद्रेत अभय देत आहे. आणि खालचा उजवा वीणेच्या तारा छेडण्यात मग्न आहे. वरचा उजवा सुरांचा ताल नियंत्रित करण्यासाठी वीणेच्या दुसऱ्या टोकास खांद्याच्या वर आहे. खालच्या डाव्या हातात पोथी आहे. या ठिकाणी तिचे वाहन कोठेच नाही. तिने करंडमुकुट घातला असून तिच्या अंगावर दागिन्यांची रेलचेल आहे. तिच्या कानात कर्णफुले, गळ्यात मोत्यांचा कंठा, चंद्राहार, हातात दोन दोन तोडे, पायात तोडे व पैंजण इत्यादी अलंकार आहेत. तिच्या गळ्यातील फुलांचा हार दोन्ही स्तनांच्या बाजूने खाली लोंबताना दिसतो. देवीने नऊवारी साडी नेसली असून तांबडे पोलके घातले आहे. कपाळावर उभे कुंकू आहे. देवीच्या मागे प्रभावळीत मध्यभागी कीर्तिमुख आणि वरच्या बाजूच्या दोन कोपऱ्यांत आलीढ आसनातील गरुडांच्या प्रतिमा आहेत. ही तंजावर मराठा चित्रशैलीतील १९ व्या शतकाच्या पूर्वार्धातील सुमारे इ. स. १८२८ मधील एक अप्रतिम कलाकृती होय.

तंजावर जिल्ह्यत अचलेश्वर म्हणून एक छोटे गाव आहे. तिथे सरस्वतीचे एक चोलकालीन सरस्वती मंदिर असल्याचे ‘विद्यादेवी सरस्वती’ या  प्र. रा. आहिरराव यांच्या पुस्तकात म्हटले आहे. हे साधे पण सुंदर बांधकाम असलेले मंदिर आहे, असे ते लिहितात.

महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यत काटोळ या गावी एका जुन्या किल्ल्याचे अवशेष असून त्यात सरस्वती व चंडिका अशा दोन मध्ययुगीन शक्तिदेवतांची मंदिरे आहेत. मात्र अन्य शिवमंदिर यादवकालीन आहे. काटोळ चेन्नई- दिल्ली मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. ते नागपूरपासून पश्चिमेस सुमारे ५७ किमीवर वसले आहे. येथील सरस्वती स्थानिक लोकांत शारदा या नावाने प्रसिद्ध असून या शारदा मंदिराच्या गर्भगृहात तांदळाच्या रूपातील दोन ओबडधोबड प्रतिमा आहेत. अलीकडे तिथे संगमरवरी पाषाणात घडविलेली सुबक देवीची मूर्ती प्रतिष्ठित केली असून मंदिराचे आधुनिक पद्धतीने बांधकाम केले आहे. माघ शुक्ल पंचमीस (वसंत पंचमी) येथे शारदोत्सव होतो.

ठाणे जिल्ह्यत भिवंडीच्या उत्तरेस वडवली नावाचे एक गाव आहे. तेथील वज्राबाई किंवा वज्रेश्वरी देवीच्या नावावरून त्यास वज्रेश्वरी नाव पडले आहे. वज्रेश्वरी मंदिर व जवळील गरम पाण्याचे झरे यांमुळे हे गाव प्रसिद्धीस आले आहे. तानसा नदीकाठावरील  एका टेकडीवर हे मंदिर आहे.  ते पूर्वाभिमुख असून त्याभोवती कोट आहे. पेशवाईपूर्वी हे मंदिर अगदी छोटे होते.  वसईचा किल्ला चिमाजी आप्पांनी काबीज (१७३९) केल्यानंतर त्यांनी हे मंदिर बांधले वा विस्तारित केले. त्याचा सभामंडप बडोद्याचे संस्थानिक खंडेराव यांनी तर पायऱ्या व दीपमाळा नासिकचे सावकार नानासाहेब चांदवडकर यांनी बांधली. प्रमुख गर्भगृहात पाच बाजूला सावित्री- सरस्वतीच्या मूर्ती आहेत.

देवी सरस्वती म्हणजे विद्येची अधिष्ठात्री हे आपल्याला माहीत असतं. सरस्वतीचा दुसरा संदर्भ आहे लुप्त झालेल्या नदीचा. याशिवाय देवी सरस्वतीबद्दल प्राचीन साहित्यात कोणकोणते संदर्भ आले आहेत, याची चर्चा-

अप्रशस्ता इव स्मसि

प्रशस्तिमम्ब नस्कृधि।

आम्ही अज्ञात आहोत,

आम्हास विख्यात कर हे सरस्वति!

‘या कुन्देन्दुतुषारहारधवला..’ या प्रार्थनेचे सूर प्रत्येक भारतीयाला परिचित असतात. अगदी लहानपणापासून सरस्वतीचे रूप सर्व विद्यार्थ्यांच्या समोर असते. राजा रविवर्मा या प्रख्यात चित्रकाराने रेखाटलेली, हाती वीणा घेतलेली, शुभ्रधवल हंसावर आरूढ, शुभ्रवसना, सात्त्विक वदनाची ही देवी भारतीय परंपरेत विद्यादायिनी व कलोपासकांना मार्गदर्शन करणारी देवी म्हणून सुपरिचित आहे. गणपती विसर्जनानंतर आता नवरात्राची धामधूम सुरू होईल. नऊ दिवसांत मातृशक्तीचा उदो उदो होईल, महालक्ष्मी, दुर्गा, काली यांच्या बरोबरीने महासरस्वतीचाही जागर होईल; म्हणून सरस्वती प्राचीन काळापासून याच रूपात होती का, विश्वातील प्राचीनतम ग्रंथात ऋग्वेदातही ही अशीच होती का, तिचे पूजन कसे करतात, या नावाची एक नदीही होती का असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. यांची उत्तरे शोधण्याचा हा स्वल्प प्रयास! सरस्वतीची त्रिविध रूपे ऋग्वेदापासून दिसतात; महानदी, वाग्देवी आणि देवी. या तीनही रूपांचा परामर्श घेऊ.

महानदी सरस्वती

सिंधू सरस्वतीच्या खोऱ्यातच वैदिक भारतीय संस्कृतीचा उगम व विकास झाला. ऋग्वेदात सरस्वती नदीवर तीन संपूर्ण सूक्ते आहेत (ऋग्वेद. ६.६१, ७.९५, ७.९६), शिवाय तिचे उल्लेख इतरत्र आहेतच. ‘महो अर्ण: सरस्वती’ असे म्हणत तिच्या प्रचंड जलसंचयाचे व घनगंभीर प्रवाहाचे वर्णन वेदांत येते. मार्गात येणाऱ्या पर्वतशिखरांना रोंरावणाऱ्या लाटांनी नेस्तनाबूत करीत ही डौलाने वाहते. गृत्समद ऋषी तिचे आवाहन ‘नदीतमे, अंबितमे, देवितमे’ असे करतात (२.४१.१६,१७). महाभारतकाळापासून ती हळूहळू लुप्त होऊ लागली व विसाव्या शतकापर्यंत ती लुप्तच मानण्यात आली. तिचा एक पूर्ववाही प्रवाह प्रयागक्षेत्री गंगा यमुनेला गुप्त रूपात मिळतो व त्रिवेणी संगम होतो अशी भारतीयांची श्रद्धा पूर्वापार चालत आली आहे. याचा शोध घेतला असता, भूगर्भात खरोखरीच असे अनेक प्रवाह आढळले व सरस्वतीच्या शोधमोहिमेला आरंभ झाला. अलीकडे पुण्याच्या डेक्कन विद्यापीठाने हरयाणा राज्यातील राखीगढ इथे उत्खनन केले तेव्हा शुष्क नदीपात्रात अनेक प्रागतिहासिक वस्तू, मानवी सांगाडे सापडले, ज्यांचा काळ इ.स. पूर्व पाच ते आठ हजार वर्षे इतका मागे जातो. एकेकाळी समृद्ध वैदिक संस्कृती इथे नांदत होती हे यावरून सिद्ध होते. सरस्वती शोध संस्थानच्या मतानुसार यमुना सरस्वती क्षेत्र, सरस्वती साबरमती क्षेत्र व राजस्थान साबरमती विभागात उत्खनन केल्यास १३०० कि.मी लांबीची सरस्वती नदी पुन्हा प्रवाहीत होऊ शकते. कुरुक्षेत्र हा प्रदेश पृथ्वीची नाभी होती. सरस्वती ही अत्यंत वेगवती नदी असून सप्त नद्यांची भगिनी होती असा उल्लेख ऋग्वेदात आढळतो. दृषद्वती, शुतुद्री (सतलज), चन्द्रभागा (चिनाब), विपाट् (व्यास- बियास), इरावती (रावी) या नद्यांनी व अशा अनेक लहानमोठय़ा प्रवाहांनी हीस समृद्ध केले. खरोखरीच ही ‘सिन्धुमाता’ होती. हिच्या तीरावर वेदांतील पंचजनांचा विकास व उत्कर्ष झाला. ऋग्वेदकालीन राज्यकत्रे- मग ते भरतवंशीय असोत, कुरुवंशीय, मत्स्यवंशीय, पांचाल असोत अथवा ययातीचे पुत्र, सर्वानी हिच्या तीरावर यज्ञयाग केले, देवांसाठी आहुती दिल्या व आपले राज्य सुस्थिर केले. भरतकुळाचे आधीचे उपाध्याय होते, ख्यातकीर्त ऋषी विश्वामित्र. नंतर वसिष्ठांनी हे पद भूषवले व दहा राजांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सुदासाला इंद्र व वरुणांच्या मदतीने युद्धात विजय मिळवून दिला. तत्कालीन शासक होते दिवोदास व सुदासासारखे लढवय्ये राजे. या भरतवंशीय राजांमुळेच हिला भारती हे नाव पडले. सरस्वतीच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेशात प्राचीन वैदिक संस्कृती बहरू लागली. मग जमिनीच्या कसाच्या जोडीने मानवी सुफलनाशीही सरस्वतीचे नाते जोडले गेले. गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रसूतीसाठी सरस्वतीची प्रार्थना केली आहे (ऋ. १०.१८४.२) पíशयन संस्कृतीतही सरस्वती अनाहिता या नावाने आढळते. आबान यश्त या जलदेवतेच्या स्तुतीत अनाहिता ही गर्भधारणेसाठी व सुरक्षित प्रजननासाठी उपास्य असल्याचे सांगितले आहे. मुळात निरंतर वाहणारा नदीचा प्रवाह हाच वंशसातत्याचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच प्राचीन संस्कृतीत नद्या या जीवनदायिनी, पुत्रसंदायिनी मानल्या जातात. सरस्वतीच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झाली. महाभारतात युद्धाच्या समयी बलरामाने सरस्वतीच्या काठाने तीर्थयात्रा केली त्याचे वर्णन आहे. दक्षाच्या शापाने चंद्राचा क्षय होऊ लागला तेव्हा त्याने सरस्वतीक्षेत्री स्नान केले व तो रोगमुक्त झाला, तसेच शंकराने ब्रह्महत्येचे पाप नष्ट करण्यासाठी कुरुक्षेत्री स्नान केले असे अनेकविध प्रसंग पुराणात क्षेत्रमाहात्म्य विशद करताना आले आहेत.

14-sarsvati-lp
सरस्वती नदी काही भौगोलिक कारणांमुळे लुप्त झाली असली तरी पुराणांत विविध कथांमधून या लुप्त होण्याची कारणमीमांसा केलेली दिसते. पद्मपुराणात अशी कथा आहे की जेव्हा और्व ऋषीने निर्माण केलेला अग्नी सर्व विश्व ग्रासू लागला, तेव्हा ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून सरस्वतीने नदीरूप घेतले व एका कलशात तो वडवाग्नी ठेवून ती पश्चिम समुद्राकडे निघाली, पापी जनांचा स्पर्श टाळण्यासाठी ती जमिनीखालून वाहू लागली, अग्नीचा ताप अस झाला की भूपृष्ठावर येऊ लागली. वामनपुराणात जरा वेगळ्या ढंगाने हा कथाभाग येतो. उत्तंक ऋषीच्या आश्रमाजवळ प्लक्ष वृक्षापासून सरस्वती उत्पन्न झाली. कुठे जायचे हे न कळल्यामुळे ती कुंठित झाली, तेव्हा मरकडेय ऋषींच्या मागोमाग जात ती प्रथम कुरुक्षेत्री गेली व नंतर दक्षिण दिशेस वाहत गेली. सरस्वती आणि दृषद्वती नद्यांच्या मधील भूभागाला मध्यदेश म्हणजेच कुरुक्षेत्र अथवा ब्रह्मावर्त असे संबोधतात. समुद्रात तो वडवानल विसर्जति करताना ती हारिणी, कपिला, नंदा, अशा विविध प्रवाहांनी वाहिली असेही आढळ्ते. या सरस्वतीच्या उपनद्या असाव्यात. महाभारतातील वृत्तांतानुसार सरस्वती एक अप्सरा होती, तीने पुरूरव्याशी संग केला व सरस्वान् नावाच्या पुत्राला जन्म दिला म्हणून ब्रह्मदेवाने तिला नदी होण्याचा शाप दिला. अप्सरा व नद्या यांचे समीकरण किंवा तादात्म्य हा पुराणकथाशास्त्रातील एक स्वतंत्र विषय आहे. ब्रह्मांडपुराणातील कथेनुसार अग्नीचा १६ नद्यांशी विवाह झाला, त्यातील एक सरस्वती होय. शिवाने त्या नद्यांना ‘धिष्ण्या’ असे नाव दिले. वैदिक कोशात धिष्ण्याचे दोन अर्थ दिले आहेत; यज्ञप्रदेश व तात्पर्य धारण करणारी वाणी. या दोन्ही अर्थानी सरस्वती समृद्ध आहे. सरस्वतीच्या लुप्त होण्याबरोबर तिच्या तीरावर राहणारे सारस्वत लोक हळूहळू स्थलांतर करू लागले. पंजाब, सिंध, राजस्थान, महाराष्ट्र तसेच गोव्यापर्यंत पश्चिम समुद्राच्या काठाकाठाने सारस्वत जनांनी वसाहती केल्या. परंपरेने उत्तरेतील ब्राह्मणांना गौड व दक्षिणेतील ब्राह्मणांना द्रविड म्हणत असत. सारस्वत लोक उत्तरेतून स्थलांतरित होऊन दक्षिणेकडे सरकले तेव्हा, तेथील ब्राह्मणांनी त्यांना गौड सारस्वत म्हणायला सुरुवात केली. हल्ली गौड सारस्वत या नावाने प्रसिद्ध असलेला समाज मूळचा सरस्वती नदीतीरावरील जनसमूह आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनही यावर अधिक संशोधन करता येईल.

वैदिक ऋषी कवष ऐलूष याचा सरस्वतीशी घनिष्ठ संबंध आहे. इलूषा नावाच्या दासीचा पुत्र म्हणून अंगिरसांनी त्याची हेटाळणी केली, तेव्हा या प्रज्ञावंत कवीने सरस्वतीचे सूक्त गायले (ऋ. १०.३०). तहानेने तळमळणाऱ्या कवषाजवळ ती वाहात आली, ते क्षेत्र ‘परिसारक’ नावाने ख्यात झाले अशी आख्यायिका ऐतरेय ब्राह्मणात आहे. नदीरूपात ही अन्नदायिनी म्हणूनच ‘वाजेभि वाजिनीवती’ (वाज म्हणजे अन्न व अन्नाच्या योगे येणारे बळ) अशी तिची स्तुती केली गेली. मानवी संस्कृतीच्या समृद्धीचे प्रथम गमक म्हणजे त्याची वाणी. बहिणाबाई म्हणतात, माझी माय सरसोती माला शिकवते बोली. नदीच्या खळाळणाऱ्या प्रवाहात तीरावर केलेल्या यज्ञातील मंत्रांचे स्वर मिसळत गेले व पाहता पाहता सरस्वती नदी वाणीच्या रूपात विकसित होऊ लागली व कोणताही भेदभाव न बाळगता सानथोरांच्या जिव्हाग्री विराजमान झाली.

वाग्देवी सरस्वती: ऋग्वेदात ‘तिस्रो देवी’ या नावाने भारती, इळा व सरस्वती यांचा संयुक्त उल्लेख आढळतो (ऋ. ७.२.८). यातील इळा हा शब्द अन्नवाचक असल्याने व सुपीकतेशी जोडल्याने नदीवाचक आहे, भारती वाणीशी संबंधित आहे तर सरस्वती देवीरूपाशी. निघंटू या ग्रंथात वाक् या शब्दाचे ५७ पर्यायी शब्द दिले आहेत त्यांत इळा, भारती, सरस्वती हे शब्द आहेत. माध्यमिका वाक् म्हणजे अंतरिक्षातील मेघगर्जना / वाणी या रूपात सरस्वतीचा निर्देश वैदिक वाङ्मयात तसेच निरुक्तात केला आहे. देवांना सोम हवा होता तेव्हा सोमाचे अधिकृत अधिकारी गंधर्व यांच्याशी वाग् सरस्वतीने व्यवहार केला. वाणीच्या बदल्यात देवांना सोम मिळाला, परंतु वाणीशिवाय देव मूक झाले, तेव्हा वाणी गुप्तपणे त्यांच्याकडे आली. ऐतरेय ब्राह्मणातील कथाभागानुसार सोमक्रयणाच्या समयी म्हणूनच उपांशुवचन (हळू पुटपुटणे) अभिप्रेत असते. विधींशी पुराकथांची सांगड अशा प्रकारे घातली जाते. ऋग्वेदात अंभृणऋषीची कन्या म्हणून वागाम्भृणी व तिचे सूक्त येते (१०.१२५) दैवी वाक् म्हणते की मीच रुद्र, वसू, आदित्य, वसर्व देवांना प्रेरणा देते, त्यांना धारण करते. मी या संपूर्ण विश्वाला व्यापून राहते, मी लोकांना एकत्र आणते, उपासकांना यज्ञफल देते, साक्षात्कारी जनांना दर्शन देते त्यांच्यावर शासन करते. खरंच वाणी नसती, भाषेसारखे प्रभावी माध्यम नसते तर आपण सर्व कसे एकत्र आलो असतो? भाषा लोकांना एकत्र आणू शकते आणि दूरही लोटू शकते. शस्त्राविनाही सामथ्र्यशील वाणीमुळे काय घडले हे सांगताना कुंभकर्णाची कथा पाहावी. कुंभकर्णाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व वर मागणार एवढय़ात सरस्वती त्याच्या जिव्हाग्री बसली. त्यामुळे ‘निर्देवत्व’ (देवांशिवाय मोठेपण) या शब्दाऐवजी ‘निद्रावत्व’ असा शब्द त्याच्या मुखातून बाहेर आला व परिणामस्वरूप तो अखंड निद्राधीन झाला. मराठय़ांच्या इतिहासात ‘ध’ चा ‘मा’ करणारी आनंदीबाई सरस्वतीच्या दृश्य रूपात (अक्षरलिपीत) हस्तक्षेप करणारी खलनायिका ठरली. रामाचे अवतारकार्य पूर्ण करण्यासाठी साक्षात सरस्वतीने मंथरेच्या मुखी आश्रय घेतला व तिच्या सल्ल्यानुसार कैकेयीने वर मागितले अशीही कथा आहे. साक्षर हा शब्द उलट वाचला तर राक्षस होतो हे अर्थाच्या दृष्टीनेही किती अन्वर्थक आहे नाही का! वाणीचा दुरुपयोग करू नये, नाही तर ती वक्त्यावरच उलटते हे सर्व धर्मात एकमुखाने सांगितले आहे.

15-sarsvati-lp
बृहदारण्यकोपनिषदात वाणी धेनूच्या रूपात येते. स्वाहा, स्वधा, वषट् व हन्त हे तिचे चार स्तन आहेत. पकी स्वाहा व वषट् यांचे दोहन देव करतात, स्वधेचे पितर आणि हन्तचे मनुष्यमात्र! सरस्वती वाग्देवीच्या रूपात चतुर्वधि आहे, ‘नमूं शारदा मूळ चत्वार वाचा’; परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. शब्दाची भागवतातील व्याख्या आहे, अर्थाश्रयत्वंशब्दस्य द्र.ष्टुìलगत्वमेव च। तन्मात्रत्वं च नभसो लक्षणं कवयो विदु-आकाशाचा सूक्ष्म अंश घेऊन अर्थ व्यक्त करणारी वाणी वक्त्याचा, चतन्याचा निर्देश करते. वैखरी मुखावाटे प्रसृत होते, स्वर व्यंजनांचे लेणे लेवून येते. शांतिपर्वातील वृत्तानुसार एकदा याज्ञवल्क्यांनी चिंतन केले तेव्हा स्वरव्यंजनांचे दागिने घालून ओंकारध्वनी करीत सरस्वती अवतरली. वैखरी हे वाणीचे प्रकटरूप आहे, हेच रूप सर्वाना ठाऊक आहे, इतर तीन रूपे गुप्त असतात व तपचिंतनानेच साध्य होतात. मानवाच्या स्थूल, सूक्ष्म, कारणशरीराशी वैखरी क्रियाशक्ती, मध्यमा ज्ञानशक्ती तर पश्यन्ती (पाहणारी, द्रष्टी) इच्छाशक्ती या दृष्टीने संबंधित आहेत. परावाणी केवळ योगीजनगम्य आहे व तिथे शब्द आणि अर्थ अविभक्त असतात. शिवपार्वतीचे अद्वैत ‘वागर्थाविव संपृक्तौ’ असे कालिदास म्हणतो, तेव्हा हेच अभिप्रेत आहे. स्कंदपुराणात अंबुवाची राजाची कथा आहे. हा मूक होता, याने हाटकेश्वरी सरस्वतीत स्नान केले, तत्क्षणी त्यास वाचा प्राप्त झाली. मग त्याने तीरावरील माती घेऊन तिची पाíथव मूर्ती केली. तीर्थमाहात्म्य, वाचाप्राप्ती व देवीस्वरूप ही तिन्ही रूपे इथे दिसतात.

सरस्वती देवी

अंबुवाची राजाने सरस्वतीची चतुर्हस्त मूर्ती केली. तिचे चार हात सर्वव्यापित्व दर्शवितात. दोन उजव्या हातांत कमळ व अक्षमाला, तर दोन वामहस्तात पुस्तक व कमंडलू अशी मूर्ती सजली. कमळ हे सृजनाचे प्रतीक, अक्षमाला एकाग्रतेचे सूक्ष्म प्रतीक, पुस्तक हे ज्ञानप्राप्तीचे स्थूल साधन तर कमंडलू हे ज्ञानामृताचे प्रतीक मानले जाते. जेव्हा गणपतीप्रमाणे सरस्वती ज्ञानासोबत कलांची अधिष्ठात्री मानली जाऊ लागली, तेव्हा तिच्या हाती वीणा आली, व ती संगीताचे, कलांचे प्रतीक झाली. अश्वतर राजा या सरस्वतीच्या पूजनाने संगीतात पारंगत झाला असे मरकडेय पुराणात आहे. ज्ञानस्वरूप असल्यामुळे शुभ्र हंस तिचे वाहन समजले जाते. कलांची देवी म्हणून मयूर वाहन आहे तर सर्जकशक्ती म्हणून ती कमलासना आहे. द्विभुजा सरस्वती विष्णुपत्नी, विष्णुमाया म्हणून प्राचीन काळापासून विख्यात होती. विष्णूने प्रकृतिमुखर (स्वभावत: अत्यंत बडबडी) सरस्वती व चंचल लक्ष्मीला कंटाळून लाकडात प्रवेश केला (दारुभूतो मुरारि:) असे एक मजेदार सुभाषित आहे. मध्ययुगात ती चतुर्हस्ता झाली. मुळात ती ब्रह्मदेवाची कन्या. तिचे अप्रतिम लावण्य पाहून सृष्टिकर्ता तिच्यावर भाळला व त्याने तिचा पत्नीत्वाने स्वीकार केला. सर्जनाच्या प्रक्रियेत नात्यांचा असा गुंता सर्व पुराकथांचा एक अविभाज्य घटक आहे. ब्रह्मदेव, विष्णू व शिवाचे एकत्रित तेज म्हणजे सरस्वती होय. म्हणूनच तिला त्रिकला असे म्हणतात. उत्तरेत विद्याप्रदा शारदा आणि दक्षिणेत शिवशक्तीच्या रूपात तिचे पूजन केले जाते. शारदीय नवरात्रातील शेवटचे तीन दिवस, सप्तमी ते नवमी महासरस्वतीचे मानले जातात. देवीभागवत आणि मरकडेय पुराणात देवीमाहात्म्यात तिला नीलसरस्वती असे म्हणून तिचे कालीशी तादात्म्य सांगितले आहे. बौद्धांनीही तारा देवीचे रौद्ररूप म्हणून नीलसरस्वतीचे वर्णन केले आहे. या रूपात ती दैत्यसंहार करते. दुष्टांचे निर्दालन व सुष्टांचे रक्षण हे दुग्रेप्रमाणेच तिचे कर्तव्य आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत महेश्वरी म्हणून पहिले तीन दिवस सर्जकशक्तीचे आवाहन, नंतरचे तीन दिवस सौंदर्य व संपत्तीचे प्रतीक महालक्ष्मीचे स्तवन आणि शेवटचे तीन दिवस परम गुह्य़ज्ञानस्वरूप ब्रह्मविद्य्ोचे सरस्वतीचे ध्यान असा उपासनाविधी आहे. देवांच्या त्रिमूर्तीप्रमाणे देवीची त्रिमूर्ती अशा प्रकारे सिद्ध झाली. वैश्विक मातृशक्तीचे हे त्रिविध आविष्कार खूप लोभस आहेत. मत्स्यपुराणात सरस्वती, सावित्री व गायत्री या तिघी ब्रह्मदेवाच्या पत्नी असे सांगून त्यांचे ऐक्य प्रतिपादित केले आहे. ब्रह्मदेवाच्या शुद्ध सत्त्वगुणापासून हिची निर्मिती झाली म्हणून् ही विमलेन्दुधवला आहे. दुर्गासप्तशतीत हिची विविध नावे येतात, महाविद्या महावाणी भारती वाक् सरस्वती। आर्या ब्राह्मी कामधेनुर्वेदगर्भा च धीश्वरी । माघ शुद्ध पंचमीला म्हणजेच वसंतपंचमीला हिचे विधिवत् पूजन करून विद्यारंभ करण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्रात घरोघरी काढली जाणारी आकडय़ांची सरस्वती हे एक यंत्र आहे. त्यातून उद्भवणारे त्रिकोण श्रीयंत्राप्रमाणे चतन्याचे, ऊर्जेचे व गुह्य़ज्ञानाचे गाभारे आहेत. ही रांगोळी अमूर्ताकडे नेणारी सोपी व मूर्त पायवाट म्हणता येईल. यंत्राच्या जोडीने तंत्रशास्त्रही विकसित झाले व बीजमंत्रांनी ध्यान होऊ लागले.

बौद्ध परंपरेत ही वज्रवीणा, आर्यसरस्वती, वज्रसरस्वती या नावांनी तर जैन परंपरेत श्रुतदेवी म्हणून प्रसिद्ध आहे. भारताबाहेर, आशियाई देशांत सरस्वतीची विविध रूपे व मूर्ती आढळतात. बहुतेक मूर्तीत सरस्वती वीणाधारिणी दाखवली जाते. बुद्धीची ग्रीक देवता अथेना किंवा रोमन मिनव्‍‌र्हा सरस्वतीचीच पाश्चात्त्य रूपे म्हणता येतील, कारण याही विद्या, वाणी व कलादायिनी मानल्या जातात. बुद्धिप्रदा शारदा हे सरस्वतीचे सर्वमान्य विशेषण! शरद् ऋतूशी संबंधित, काश्मीरमधील शारदापीठाशी संलग्न म्हणून शारदा. शिवाय ही सार+दा, श्रुतींचे सार देणारी आहे. ही केवळ सरस्+ वती, जलाशयांनी युक्त नाही, तर सार+स्व+ वती म्हणजे आत्मज्ञानाचे सारसर्वस्व देणारी चिद्घनचपला आत्मशक्ती आहे. ही ‘अभिनव वाग्विलासिनी चातुर्यार्थकलाकामिनी विश्वमोहिनी’ आहे यात काय संशय!

No comments:

Post a Comment

Please do write your suggestions and thoughts.