मुंबईचा इतिहास - Mumbai history in marathi
चला, शोधूया ऐतिहासिक मुंबई
मुंबईचा इतिहास शिकवला जातो तेव्हा नेहमीच पोर्तुगिज काळ, १५ व्या शतकात सात बेटांच्या शहराची निर्मिती, पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंदण दिली हेच वारंवार सांगितले जाते. मात्र, मुंबईला त्यापूर्वीचाही इतिहास आहे. कोकण इतिहास परिषद मुंबईचा इतिहास नव्याने समोर आणण्याच्या प्रयत्नात आहे. मुंबईच्या इसवीसन पूर्व काळातील पाऊलखुणा सापडल्या आहेत. मात्र कोकणामध्ये उत्खनन झाले तर या गोष्टी समोर येऊ शकतील. त्यामुळे आता मुंबईचा हा इतिहास नव्याने शोधण्यासाठी कोकण इतिहास परिषदेने पुढाकार घेतला आहे..........
मुंबईच्या इतिहासाचा शोध घेत गेल्यास सम्राट अशोकाच्या काळापासून संदर्भ आढळतात. नालासोपाऱ्यामध्ये १८८५-८६ च्या सुमारास डॉ. भगवानलाल इंद्रजी यांनी संशोधन केले होते. त्यावेळी त्यांना सम्राट अशोकाच्या काळातील स्तूप आढळले, आज्ञाशिला मिळाली. त्यांच्या काळात दहिसर नदीचे संशोधन केले होते. त्यामध्ये आदिमानवाची हत्यारेही आढळून आली. त्यामुळे मुंबई ऐतिहासिक आणि भौगोलिक दोन्ही अनुषंगाने आदिमानवाच्या काळापासून अस्तित्वात असल्याचे उलगडते. मात्र यास पुष्टी मिळण्यासाठी अधिक शोधकार्य होणे गरजेचे आहे. मात्र ब्रिटिश गेले आणि मुंबईच्या इतिहासाचा जो शोध घेतला जात होता, त्याला खीळ बसली, अशी माहिती कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी दिली. मुंबईला भौगौलिक आणि आदिमानवकालीन संदर्भ आहेत. मात्र ज्या पद्धतीने या विषयात संधोशन होणे अपेक्षित होते, तसे झाले नाही, ही खंत इतिहास अभ्यासकांना आहे.
मुंबई किनारपट्टीची सात बेटे होती. इसवीसन पहिल्या दशकात जुन्या काळामध्ये ८० बंदरांच्या नोंदी आहेत. त्या कालखंडात सातवाहनांचे राज्य होते. पैठण ही त्यांची राजधानी मानली जाते. त्यांचा संबंध रोमन, ग्रीक, पर्शियन, अरेबियन लोकांशी आल्याचे मानले जाते. या लोकांशी झालेल्या उद्योगातून महाराष्ट्र हे मोठे राज्य निर्माण झाले. मग राज्यात मोठा उद्योगधंदा सुरू झाला. त्यांनी दिलेल्या देणग्यांमधून आजूबाजूला मोठ्या लेण्या खोदल्या. बोरीवलीला लेण्यांचे मोठे संकुल आहे. तेव्हा तिथे सुमारे ९० लेण्या होत्या. आजही तिथे खोदकाम केले तर लेण्यांची संकुले सापडतात. घारापुरीची लेणी आहे. मुचलिंद-मुलुंड येथेही लेण्यांचे संकुल मिळतील. बौद्धकालीन लेण्या, महाकालीची लेणी, मागाठाणेची लेणी आहे. या सबंध किनारपट्टीवर लेण्यांचा प्रभाव होता. सम्राट अशोक किंवा सातवाहनांचा हा सर्वात मोठा कालावधी आहे.
कोकण किनारपट्टीवर मुंबई ही आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मोठे केंद्र होती. त्याच्या पुढे मग काही कालखंडाने येथे अनेक राजसत्ता होऊन गेल्या. कलचुरी, गुप्त सम्राट, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहर, यादव यांचे राज्य येऊन गेले. या राजानंतर मग पोर्तुगीज आले. हा आधीचा इतिहास पूर्ण दुर्लक्षित राहतो. राजकीय उलथापालथीमुळे किंवा पोर्तुगीजांनी काही वास्तू उद्ध्वस्त केल्या असतील म्हणून कदाचित या खुणांचा आपण विचार करत नाही. काही काळ मराठ्यांचीही राजसत्ता आली होती. याचा साद्यंत इतिहास समोर आला पाहिजे. सुटलेले धागेदोरे उलगडले पाहिजेत.
सातवाहन कालखंडामध्ये मुंबईचे नाव काय होते हा प्रश्न उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिलालेखांमध्ये हा उल्लेख सेठगिरी असा आहे. तो शेतगिरी असावा, असे लाड सांगतात. शेत म्हणजे सारा वसूल करण्याची गावे असावीत. कामशेत, कुमशेत, तळाशेत अशी गावांची नावे आजही आहेत. जिथे शेत नावाची गावे निर्माण झाली तिथे लेण्याही तयार झाल्या, असा संदर्भ आढळून येतो.
कोळी समाज मुंबईतील मूळचा असल्याचे मानण्यात येते. येथे कोल हे सरदार होते. हे सातवाहनांचे सरदार होते. कोलवरून कोलीय वंश आणि कोळी असे नामकरण झाले असावे. सातवाहनांच्या काळात १६ जनपदे होती यात पांचाळ, शाक्य, मालवगण, मल्लवी, लिच्छवी यांचा समावेश होता. हे घटक स्थलांतरित होत महाराष्ट्रात आले. कोल सरदारांवरून मुंबईच्या काही भागांचा इतिहास समजू शकतो. यामध्ये कोलाबा, कोल कल्याण, कोलडोंगरी, कोलाड अशी गावांची नावे पडली. सांताक्रूझला पूर्वी कोल कल्याण म्हटले जायचे. मात्र याबद्दल फारशी माहिती लोकांना नाही. याबद्दल सांगताना लाड म्हणतात की आपण जातीय दृष्टिकोनातून इतिहास लिहितो. आपण हवे तेवढेच घेतो त्यामुळे वास्तव अधोरेखित होत नाही. प्रत्येक भूगोलाच्या मागे इतिहास आहे. आधी भौगोलिक रचना तयार होते. मग इतिहास घडत जातो. मुंबईला प्राचीन इतिहास असताना त्या दृष्टिकोनातून विचार केला जात नाही.
मुंबईच्या संदर्भात सात शिलालेख आणि तीन ताम्रपट मिळाले आहेत. हे ताम्रपट दहाव्या शतकातील आहेत. याचा संपूर्ण अभ्यास करण्यात आला आहे. शिलाहरांच्या कार्यकाळातील शिलालेख असून यातील एक शिलालेख परळ गावात आहे तर दुसरा गिरगावात फणसवाडीत आहे. मात्र हे दोन्ही शिलालेख वाचता येत नाहीत. इतर शिलालेखांमधून सातवाहन काळापासूनचा इतिहास मिळतो. प्रत्येक राजाच्या कारकिर्दीत स्थलांतर झालेले दिसते. पाठारे प्रभू चंपानेर आणि पैठणचे. पैठणचे नाव पेतनिक होते. हे अशोककालीन नाव आहे. मग त्याचे पैठण झाले. त्याचे पाताणे झाले. पाठारे प्रभू बिंब राजासोबत आले. असा स्थलांतराचा इतिहास उलगडत जातो.
घारापुरी लेण्यांमध्ये सातवाहनकालीन नाणी मिळाली आहे. हे मुळचे भारताचे प्रवेशद्वार होते. आत्ताचे अपोलो बंदर येथील गेट वे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार मानले जाते. अपोलो बंदरचे आधीचे नाव पालव. कोळी समाजामध्ये सुमद्राकडे जाणाऱ्या टोकाला पालव म्हणतात. त्यावरून हे नाव पुढे आले. आजही या ठिकाणी उत्खनन होण्याची मोठी गरज आहे. सामुद्रिक उत्खननाला आपल्याकडे फार महत्त्व दिले गेले नाही, अशी खंत लाड यांनी मुंबईचा इतिहास सांगताना व्यक्त केली. राज्यात उत्तरेकडे, खानदेश, मराठवाडा, पुणे येथे उत्खनने झाली. कोकणात मात्र असे उत्खनन झालेले नाही. मुंबईमध्ये, मुंबईच्या आसपास एवढ्या लेण्या आहेत. त्यांचा इतिहास उलगडण्यासाठी उत्खनन होणे गरजेचे आहे. द्वारकानगरी ज्यांनी शोधून काढली ते एस. आर. राव यांना घारापुरीजवळ उत्खनन करायचे होते. मात्र त्यांचे हे काम राहून गेले. पूर्वी व्यापारी मार्ग समुद्रातून जात होते. नद्यांचे उगम आहेत तिथपर्यंत जाता येईल. सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये शोध घेता येईल. पालशेत नावाचे गुहागरच्या बाजूला एक बंदर आहे. गुहागरला आदिमानवकालीन हत्यार मिळाले आहे. कोकणामध्ये अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. येथे ४०० वर्षे राजसत्तांनी कारभार गाजवला. त्यामुळे या भूमीच्या पोर्तुगिजांपलीकडील इतिहास समोर येण्याची गरज आहे. त्यासाठी संशोधकांनी, अभ्यासकांनीही पुढे यावे अशी अपेक्षा कोकण इतिहास परिषदेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईचा इतिहास गाडला जातोय!
ज्या जुन्या रस्त्यांमुळे आपली मुंबई घडली त्यांची साक्ष देणारे ऐतिहासिक मैलाचे दगड आजही या वाटांच्या कडेला निपचित पडून आहेत. या शहराच्या जडणघडणीचे साक्षीदार असणाऱ्या ब्रिटिशकालीन १३ मैलांच्या दगडांपैकी ७ दगड यापूवीर्च अनास्थेचे बळी ठरलेत. उरलेले सहाही फार काळ तग धरतील अशा अवस्थेत नाहीत...
.......
पाण्याने वेढलेली बेटे एकमेकांना जोडली जाऊ लागली आणि मुंबई नावाच्या महानगरीचा जन्म झाला. ही बेटे जोडण्यासाठी ब्रिटिशांनी समु्दात भर घातली, नवे रस्ते उभारले. या रस्तांचे अचूक मोजमाप करून जागोजागी मैलाचे दगड बसवण्यात आले. या मोजमापासाठी गोऱ्या सायबाने हॉनिर्मन सर्कलजवळचे संेट थॉमस चर्च हा शून्य मैल मानला आणि त्यापुढील प्रत्येक दगडावर या चर्चपासून किती मैल हे अंतर नांेदवले.
पंचकोनी आकाराच्या बेसॉल्ट दगडांवरील या खुणांनी मुंबईची वाहतूकव्यवस्था उभी उभारली. पण आता अंतर मोजण्याची पद्धती बदलली, मैलाचे मोजमाप संपले आणि किलोमीटर आले. त्यामुळे आता फार उपयोगाचे नसले तरी या महानगरीचा इतिहास असणारे हे मैलाचे दगड आज जमिनीच्या पोटात गाडले जाताहेत.
या मूळ १३ मैलांच्या दगडांपैकी सात रस्ता रुंदीकरण, नव्या इमारती किंवा फुटपाथच्या बांधकामामुळे कधीच उखडले गेलेत. त्यांचा कुठेच थांगपत्ता लागत नाही. तर जे आहेत ते काही अर्धवट दिसताहेत, तर काही कंबरेत वाकले आहेत. त्यातील एकाच्या कडेला सार्वजनिक बाकडं बांधलंय तर एकावर चक्क फळवाल्याने आपला धंदा थाटलाय.
ग्रेड वन हेरिटेज मूल्य असणारा हा ऐतिहासिक वारसा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि आपल्या अनास्थेमुळे अस्तंगत होतोय. एकाही दगडाजवळ त्याचे महत्त्व सांगणारा फलक नाही किंवा त्याच्या जपणूकीसाठी साधी कुंपणासारखीही व्यवस्था नाही. ही अवस्था अशीच राहिली तर हरवलेल्या सात मैलाच्या दगडांप्रमाणे हे इतिहासाचे साक्षीदारही काळाच्या उदरात गुडूप झाल्याखेरीज राहणार नाहीत.
* पहिला मैलाचा दगड
मेट्रोकडून काळबादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजुच्या फुटपाथवर एस. पी. जैन इन्स्टि्यट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटच्या दाराजवळ अर्धवट जमिनीत रुतलेला पंचकोनी दगड दिसतो. हा मुंबईचा पहिला मैलाचा दगड. रोमन लिपीमध्ये लिहिलेला एक स्पष्ट दिसतो, पण त्याखालील माइल्स ही इंग्रजी अक्षरे मात्र अधीर् जमिनीवर आणि अधीर् जमिनीखाली अशी दिसतात. अजून दोन-चार वेळा फुटपाथचे काम निघाले तर हा दगड आणाखी जमिनीत जाईल किंवा पूर्ण दिसेनासाही होईल.
* तिसऱ्या मैलाचा दगड
ताडदेवच्या भाटिया हॉस्पिटलसमोर कामत हॉटेलच्या जवळ फुटपाथवर मुंबईच्या तिसऱ्या मैलाचा दगड आढळतो. अगदी वाटेत असलेला हा मैलाचा दगडही अर्ध्याहून अधिक जमिनीत गेलाय. साधारणत: तीन-साडेतीन उंच असला तरी सध्या त्याचा एक-दीड फूटच भागच जमिनीवर उरलाय. त्यावरील माइल्स ही अक्षरे फूटपाथच्या दगडांवर डोकावायचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात.
* तिसऱ्या मैलाचा (दुसरा) दगड
ऑॅगस्ट क्रांती मैदानाकडून कंेप्स कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, डाव्या बाजुच्या फुटपाथवर संेट्रल बँकेच्या एटीएमशेजारी एक फळवाला बसतो. हा फळवाला जेथे फळांचे करंडे मांडतो तो दगड साधासुधा नाही तर तिसऱ्या मैलाचा (दुसरा) दगड आहे. तुम्हाला हा दगड पाहायचा असेल तर त्या फळवाल्याला बाजुला करावं लागतं किंवा भल्या पहाटे तो फळवाला येण्याआधी तेथे पोहोचावे लागते. इतर मैलाचे दगड आणि या दगडात एक महत्त्वाचा फरक आहे. इतर दगडांवर रोमन लिपीत आकडे आढळतात, तर यावर मात्र लँटिन लिपीमधला ३ दिसतो. तसेच इतर दगडांर संेट थॉमस चर्च असे लिहिलंय, पण या दगडावर मात्र कॅथेड्रल असे लिहिलय. संेट थॉमस चर्चला कॅथेड्रलचा दर्जा जुलै १८३७ मध्ये मिळाला. म्हणजेच हा दगड त्या नंतरचा आहे.
* चौथ्या मैलाचा दगड
ना. म. जोशी मार्ग (डिलाइल रोड) आणि साने गुरुजी मार्ग (आर्थर रोड) एकमेकांना जेथे छेदतात, तेथून चिंचपोकळीचा पूल सुरू होण्याआधीच्या रस्त्यावर ब्लू बर्ड बेकरी दिसते. या बेकरीच्या समोर काही बाकडी आहेत. यातील एक बाकड्याच्या पाठी हा चौथ्या मैलाचा दगड विसावला आहे. त्यावरील ४ माइल्स फ्रॉम एवढीच अक्षरे स्पष्टपणे दिसत असून बाकीची फुटपाथच्या खाली आहेत.
* सहाव्या मैलाचा दगड
दादरला डॉ. बाबसाहेब आंबेडकर मार्गावर असलेल्या चित्रा थिएटरसमोर असलेल्या एअरटेलच्या गॅलरीपुढे सहाव्या मैलाचा दगड कललेल्या अवस्थेत आढळतो. हा दगड अजूनही बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत असून त्यावरील ६ माइल्स फ्रॉम थॉमस चर्च ही अक्षरे स्पष्ट दिसत आहेत. पण त्याचा पाया पक्का करण्याची गरज आहे. नाहीतर एक दिवस रत्स्त्याच्या कामात तो आडवा पडेल आणि मूळ जागा गमावून बसेल.
* आठव्या मैलाचा दगड
शीव किंवा सायन ही जुन्या मुंबईची सीमा. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या उजवीकडे सायन-पूवेर् परिसरात तामिळ संघम ही सुप्रसिद्ध संस्था आहे. या तामिळ संघमच्या गल्लीमध्ये कर्नाटक बँक आहे. या बँकेच्या थोड्या पुढे मुंबईचा हा आठव्या मैलाचा दगड आहे. या परिसरात तुलनेने कमी वर्दळ असल्याने आणि मुख्य रस्त्यापासून आतमध्ये असल्याने हा दगड शोधणे थोडे अवघडच जाते. हा दगडही सुस्थित असला तरी वाकला आहे. त्यावरील ८ माइल्स फ्रॉम संेट थॉमस चर्च ही अक्षरे स्पष्ट दिसत असली तरी कुणी हौशी माणसाने त्याला पिवळा ऑॅइलपंेट फासला आहे.
मुंबईचा कलात्मक ठेवा
मुंबईचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या, प्रसिद्ध डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाची दखल ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने घेतली आहे. पर्यटकांच्या दृष्टिने महत्त्वाच्या अशा मुंबईतल्या पाच ठिकाणांमध्ये या वस्तुसंग्रहालयाचा समावेश करण्यात आला आहे. यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत मुंबईमधल्या या अमूल्य ठेव्याला जरुर भेट द्या. या वस्तुसंग्रहालयाची एक सफर मटा तुम्हाला घडवून आणतोय…
‘राव तुमच्या मुंबईत येऊन राणीची बाग पाहायची राहून गेली बघा...’ असं कुणी म्हटलं की त्याला थेट येडचाप ठरवलं जाण्याचा एक जमाना होता. याच राणीबागेच्या प्रवेशद्वाराजवळचं मुंबईतील प्रसिद्ध डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय देखील अनेक हौशा नवशा गवशांना माहित नसतं. त्यांनाच कशाला, अनेक मुंबईकरांनाही त्याविषयी नीट माहिती नाही. पण पुरातन कला, संस्कृती, समाज ज्यांना समजून घ्यायचाय अशा दर्दी आणि कलाप्रेमी रसिकांना डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय कुठे आहे ते सांगावं लागत नाही, त्यांची पावलं तिथं आपसूकच वळतात.
भायखळा स्टेशनपासून अवघ्या पाच ते दहा मिनिटात राणीबागेत पायी पोहोचता येतं. तिथून प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला हे डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय आहे. राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट म्युझियम हे या वस्तुसंग्रहालयाचं मूळ नावं. इटालियन रेनेसान्स शैलीचं बांधकाम आणि या वास्तूची कलात्मकता पाहता क्षणी वस्तूसंग्रहालय किती भव्य आहे, याची कल्पना येते. मुंबईचा इतिहास, भूगोल, साहित्य, लोकजीवन, कलाकृती याचा आंखोदेखा हाल एकाच ठिकाणी पाहता यावा या हेतूने हे वस्तुसंग्रहालय उभं राहिलं आहे. मुंबईतलं पहिलं व कोलकाता, चेन्नईनंतर तिसरा क्रमांक या वस्तुसंग्रहालयाचा लागतो. ही वास्तू उभारण्यासाठी डॉ. भाऊ दाजी लाड यांनी अविश्रांत श्रम घेतले. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन स्वातंत्र्यानंतर सन१९७५ला या वस्तुसंग्रहालयाला डॉ. भाऊ दाजी लाड यांचे नाव दिलं गेलं.
मुंबई शहरातल्या ब्रिटिशकालीन मान्यवरांचे पुतळे इथे जतन करून ठेवले आहेत. मेट्रो चित्रपटगृहासमोर असलेला फिट्झगेराल्डचा भलामोठा दिवा व कारंजंही आहे. शिवाय घारापुरी लेण्यांमधला प्रचंड दगडी हत्ती व एक तोफ इथे आहे. लॉर्ड हार्डिग्स (गव्हर्नर जनरल अपोलो बंदर, मुंबई), लॉर्ड सँडहर्स्ट (गव्हर्नर जनरल, एस्प्लेनेड, मुंबई), क्वीन व्हिक्टोरिया (ब्रिटनची राणी, फोर्ट) असे विविध ठिकाणांहून आणलेले अनेक पुतळे संग्रहालयाबाहेर आहेत.
प्रवेशद्वाराच्या दगडी पायऱ्या चढून वर आल्यानंतर शिसवी दरवाजा असलेली तीन मोठी प्रवेशद्वारं लागतात. त्याच्या आतील नजारा एखाद्या भव्य राजवाड्यासारखा आहे. सोन्याचा वर्ख असलेल्या बारा खांबांच्या स्वागत कक्षावरील नक्षीकाम केलेलं रंगीत छत नजरेत भरतं. इथलं नेपथ्य आणि प्रकाशयोजना युरोपियन ऑपेरा किंवा मराठी संगीत नाटकांच्या काळातील भरजरी मखमली स्टेजची आठवण करून देतो. तळमजल्यावरील भल्यामोठ्या संग्रह दालनात आपण प्रवेश करतो तेव्हा प्रथम समोरील उंचावरचा अल्बर्ट प्रिन्स कॉन्सर्ट आणि डेव्हिड ससूनचे पुतळे लक्ष वेधतात.
तळमजल्याचं प्रचंड दालन म्हणजे ब्रिटिश आणि भारतीय संस्थांनी वातावरणाची आठवण करून देणारे आहे. आकर्षक मांडणीतून विविध वस्तूंचे सादरीकरण व त्यासोबतची माहिती यामुळे मार्गदर्शकाची आवश्यकता भासत नाही. हे औद्योगिक कलादालन आहे. प्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेल्या नक्षीयुक्त वस्तू, आकर्षक माती-धातूची भांडी, लाकूड शंख-शिंपल्यावरील कलाकुसर आणि अनेक धातूंच्या मूर्तींनी हे दालन सजलेलं आहे.
या दालनांत प्रामुख्याने म्हैस आणि गवा यांच्या शिंगांपासून बनविलेल्या वस्तू, नक्षीकाम केलेली माती आणि विविध धातूंची भांडी, हस्तिदंतावर केलेली कलाकुसर, लाकडावर प्राण्यांच्या हाडांवर, शंख-शिंपल्यांवर केलेली कलाकुसर, विविध धातूंच्या मूर्ती, राधा-कृष्ण आदींची विविध शैलीतील चित्रं अशा अनेक वस्तूंची सुरेख मांडणी करण्यात आलेली आहे. तळमजल्यावरील दालनाच्या उजव्या हाताला एक छोटं सभागृह आहे. इथे १९ व्या शतकातल्या चित्राकृती आहेत. येथे वस्तुसंग्रहालयाची माहिती देणाऱ्या चित्रफितीचं दृक्श्राव्य सादरीकरण पाहाता येतं. पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी मधोमध मोकळी जागा सोडून दोन्ही बाजूंनी ४० पायऱ्यांचा प्रशस्त दगडी जिना आहे. जिन्याच्या मध्यावर असलेल्या संस्थापकांच्या दालनात वस्तुसंग्रहालयाशी संबंधित तत्कालीन मान्यवरांची भलीमोठी तैलचित्रं पाहायला मिळतात. त्यात जमशेठजी जीजीभॉय, जगन्नाथ नाना शंकर शेठ, भाऊ दाजी लाड या भारतीयांबरोबर काही ब्रिटिश अंमलदारांचीही तैलचित्रं आहेत. या कलादालनाला मधोमध मोकळी जागा असून, त्याला लोखंडी कठडे आहेत. या मजल्याच्या दोन्ही बाजूस सुशोभित खांब छतापर्यंत पोहोचले असून, मजल्याचं छतही चित्राकृतीमुळे आकर्षक वाटते.
‘मुंबईतलं लोकजीवन’ नावाच्या दालनात एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या मुंबईतील लोकजीवनावर प्रकाशझोत टाकला आहे. अनेक जात, धर्म, पंथाच्या लोकांच्या पारंपरिक पोशाखाचे अर्धपुतळे बघितल्यावर बहुरंगी-बहुढंगी मुंबईची कल्पना येते. मुंबईच्या विकासाला हातभार लावणाऱ्या जहाज व्यवसायाची स्थित्यंतरं, पारसी समाजाची स्मशानभूमी, ग्रामीण जीवन, घरगुती आणि भारतीय खेळ, चिलखतधारी योद्धा, नृत्यासह वापरातील अनेक वाद्यं, मातीचे नकाशे हे सारं पाहताना औद्योगिक क्रांतीपासूनचा मुंबईचा इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो.
कमलनयन बजाज कलादालनात कपड्यांवरील अप्रतिम कलाकुसर, मुंबईतल्या कापड गिरण्या व त्याचा परिसर, त्या काळचं लोअर परळ रेल्वेस्थानक आणि आता दुर्मीळ वाटणारा बिडाचा जिना ही या दालनाची वैशिष्ट्यं आहेत.
अनेक पर्यटक मुंबईमध्ये धावत्या भेटीवर येतात. या पर्यटकांना मुंबईचा इतिहास, मुंबईची संस्कृती समजून घ्यायची असेल, तर भायखळ्याच्या भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाची भेट महत्त्वाची आहे. मुंबईचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या या संग्रहालयाची दखल त्यामुळेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने घेतली आहे. पर्यटकांच्या दृष्टीने मुंबईमधील महत्त्वाच्या ठिकाणांच्या यादीमध्ये पहिल्या पाचमध्ये डॉ. भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाचा समावेश न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे.
मुंबईमध्ये काळा घोडा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय प्रसिद्ध आहे. मात्र वेळ कमी असल्यावर पर्यटकांनी डॉ. भाऊ दाजी लाड नक्की पाहावे, असे आवाहन या लेखाद्वारे करण्यात आले आहे. हे संग्रहालय व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम म्हणून १८७२ साली सुरू झाले. हे संग्रहालय सध्या जिथे आहे, तिथेच होते. त्यानंतर १९७५ साली याचे नामकरण डॉ. भाऊ दाजी यांच्या नावाने करण्यात आले.
गेट-वे, बॉम्बे कॅन्टीन, नरिमन पॉइंटही
न्यूयॉर्क टाइम्सच्या या लेखामध्ये मुंबईतील एकूण १२ जागांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गेट-वे ऑफ इंडिया, द बॉम्बे कॅन्टिन, नरिमन पॉइंट आणि चोर बाजार यांचा समावेश पहिल्या पाच ठिकाणांच्या यादीत आहे. या व्यतिरिक्त हाजी अली दर्गा, माऊंट मेरी चर्च, ताज महाल टी हाऊस, द बॉम्बे आर्ट सोसायटी आणि मुंबईतील काही प्रसिद्ध खाण्यापिण्याच्या ठिकाणांचा समावेश आहे.
मुंबईतील लेण्यांचे जतन गरजेचे!
सध्या मुंबईत सुमारे १७५ लेण्या आहेत. आपल्याला मुंबईचा २०० वर्षांपासूनचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर या लेण्या जपायला हव्यात आणि त्यांचे जतन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाचे प्राध्यापक डॉ. सूरज पंडित यांनी व्यक्त केले. युवा मंच, लोकमान सेवा संघ, विले पार्ले येथे आयोजित करण्यात आलेल्या 'आपली मुंबईः मुंबई शहराची नव्याने ओळख' या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. 'महाराष्ट्र टाइम्स' या व्याख्यानमालेचे मीडिया पार्टनर होते. व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी, गुरुवारी डॉ. पंडित यांनी वरील प्रतिपादन केले.
मुंबईला प्राचीन इतिहास आहे. या शहराचा वारसा, त्याची माहिती पुढच्या पिढीला मिळावी, या हेतूने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेसाठी बहिःशाल शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठाचे विशेष सहकार्य लाभले. शेवटच्या दिवशी डॉ. सूरज पंडित यांनी मुंबईतील लेणी समूह या विषयावर मार्गदर्शन केले. मुंबईतील बौध्द (कान्हेरी, मागठाणे आणि महाकाली), शैव पाशूपत (एलिफंटा, मंडपेश्वर व जोगेश्वरी) लेण्यांच्या शिलालेखात दडलेला मुंबईचा इतिहास त्यांनी सर्वांसाठी खुला केला आणि लेण्यांमधील विविध देवतांच्या शिल्पांची ओळख पटेल अशा कथांविषयी माहितीही करून दिली. विशेष म्हणजे, अनेकदा खरा इतिहास समोर येत नाही, त्यामुळे ही लेणी पांडवांनी बांधली, येथे राम आला होता, अशा कथांचा जन्म होतो.
मुंबईतील लोकसंख्या, बांधकामं, आर्थिक विकास याबाबत खूप विचार होतो. त्यामुळे शहरातील भूशास्त्रीय अवशेष व ऐतिहासिक संपत्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. २१ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या व्याखानमालेची सुरूवात डॉ. रोहिण्टन अवासिया यांच्या व्याखानाने झाली. 'मुंबई भूशास्त्रीय कथा' या विषयावर डॉ. अवासिया यांनी मार्गदर्शन केले. डॉ. अवासिया यांनी मुंबई, भारतीय पृष्ठीय प्लेटचा भाग, गोंदवाना खंडामधील, मुंबईतील खडकांचे प्रकार, मुंबईतील डेक्कन ट्रॅप लाव्हाशी संबंधित खडक, मुंबईतील लाव्हा प्रवाहाचे वयोमान, हिमायुगातील मुंबई, मुंबईतील जलसमाधीस्त जंगल, मुंबईतील उंचावलेले किनारे, आदींबाबत माहिती दिली.
तर दुसऱ्या दिवशी डॉ. कुरूष दलाल यांनी मुंबईच्या प्रागैतिहासाच्या पाऊलखुणा या विषयावर व्याखान दिले. मुंबईतील पाली (वांद्रे), कांदिवली, एरंगळ इत्यादी ठिकाणी सापडलेली हत्यारे, त्यांचे विविध प्रकार व हत्यारे बनविण्याची पध्दत याविषयी माहिती दिली.
मुंबईचे किल्ले होणार 'टूरिस्ट स्पॉट'
मुंबईच्या विकासातील विविध टप्प्यांचे साक्षीदार ठरलेल्या मुंबईतील किल्ल्यांच्या डागडुजीचं काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुरातत्व विभाग आणि बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज यांच्यातर्फे सध्या सुरू आहे. त्यातील शिवडी, वांदे, घोडबंदर आणि वरळी यांचं काम वेगाने सुरू असून येत्या मार्च २००८ पर्यंत हे किल्ले पर्यटनासाठी खुले होतील, अशी चिन्हं आहेत.पर्यटन खात्याचे सचिव आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली. डागडुजी आणि आवश्यक ती दुरूस्ती करून या किल्ल्यांना त्यांचं गतवैभव परत मिळवून देण्यात येईल मात्र त्यानंतर ठिकाणी पर्यटक यावेत, किल्ल्यांचं जतन-संरक्षण व्हावं, यासाठी किल्ले व्यवस्थापनाची कामगिरी बॉम्बे चेंबरवर सोपवण्यात आली आहे. चेंबर अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना त्यांनी हे किल्ले दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
तीन-चारशे वर्षांपूवीर् मुंबई बंदरावर उभारण्यात आलेले हे किल्ले हा ऐतिहासिक ठेवा जपला पाहिजे याचा साक्षात्कार राज्य सरकारला झाला आहे. या चारही किल्ल्यांच्या डागडुजीसाठी सुमारे १० कोटीं रुपयांचा खर्च येणार अपेक्षित आहे. यातील साडे सात कोटी रुपये भारत सरकार खर्च करणार असून उर्वरित अडीच कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे. देशा-विदेशातील पर्यटकांचा मुंबईत वर्षभर ओघ असतो. हे किल्ले पर्यटकांसाठी खुले करून मुंबईचा वैभवशाली इतिहास जगाला सांगण्याबरोबरच ऐतिहासिक ठेवा जपला जाईल असा विश्वास पुरातत्व खात्याचे संचालक आर.एन. हेगडे यांनी व्यक्त केला. सध्या डागडुजी आणि दुरूस्तीचे काम प्रगती पथावर असून मार्च २००८ पासून येथे पर्यटकांची वर्दळ दिसू लागेल असे सांगण्यात येत आहे.
मुंबईच प्राचीन कोकणाची राजधानी?
मुंबई शहरच 'पुरी' असल्याचा अभ्यासक सोष्टेंचा दावाहॅप्टेनेशिया, पुरी, कपर्दीद्विप, बिंबस्थान, भिमपुरी, मानबाई, यमपुरी, बॉम्बे आणि मुंबई... काळानुरूप बदलत गेलेली ही मायानगरीची नावे. देशाची आर्थिक आणि ग्लॅमरची राजधानी असलेली मुंबईच प्राचीन कोकणाची राजधानी 'पुरी' असल्याचा दावा अभ्यासक सिद्धार्थ सोष्टे यांनी केला आहे. सोष्टे यांनी 'मुंबईचा अज्ञात इतिहास' या पुस्तकाच्या माध्यमातून दावा केला आहे. त्यासाठी मुंबईच्या प्राचीनत्वाचे दाखले देणाऱ्या पुराव्यांची संदर्भासह मांडणीही पुस्तकात केली आहे.
प्राचीन कोकणची राजधानी 'पुरी' या नावाने ओळखली जात होती. ही 'पुरी' नेमकी कोणती यावर अभ्यासकांचे आजही एकमत नाही. त्याबाबत विविध मतमतांतरे आहेत. मुंबई शहर हीच 'पुरी' असल्याचा निष्कर्ष या पुस्तकात मांडण्यात आला असून, त्यासंबंधीचे ऐतिहासिक व भौगोलिक संदर्भ देण्यात आले आहेत. मुंबईतील प्राचीन वारसास्थळांची शहानिशा या पुस्तकात करण्यात आली आहे. परकीय राजवटींमध्ये या वारसास्थळांचे नुकसान अथवा स्थलांतर कशाप्रकारे करण्यात आले आणि त्यामुळे मुंबईची प्राचीन ओळख कशी नष्ट झाली हे मांडण्याचा प्रयत्न सोष्टे यांनी केला आहे. प्राचीन ते आधुनिक प्रवासात मुंबई बेटाला मिळालेली विविध नावे आणि त्या नावांमागील कारणे स्पष्ट करणारी माहितीही त्यांनी दिली आहे.
त्याबाबत बोलताना सोष्टे म्हणाले, 'इसवी सनाच्या सुरुवातीपासून ते मुंबईची बेटे ब्रिटिशांच्या ताब्यात जाईपर्यंत ज्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या त्या सर्वांचा परामर्ष या पुस्तकात घेतला आहे. प्राचीन ते आधुनिक मुंबईची अनेक स्थित्यंतरे यात संक्षिप्तपणे दिली आहेत. नागस्थान ते नागोठणे या पुस्तकासाठी संशोधन करत असताना उत्तर कोकणाचा इतिहास मी अभ्यासला. त्याचे संदर्भ शोधताना कोकणची प्राचीन राजधानी असलेल्या पुरीचे उल्लेख वाचायला मिळाले. पुरी या ठिकाणाची ठाम स्थलनिश्चिती अजूनही झालेली नाही. पुरीचे संदर्भ जसजसे मिळत गेले तसतसे स्पष्ट होत गेले की, मुंबई हीच पुरी आहे. हाच धागा पकडून पुस्तकाची निर्मिती केली आहे.'
वाळकेश्वराचे मूळ मंदिर नष्ट करण्यात आले. सध्याचे मंदिर लक्ष्मणेश्वराचे आहे. शिवडीचा किल्ला शिवमंदिर ध्वस्त करून बांधण्यात आला; तर मुंबादेवीचे मूळ मंदिरही ब्रिटिशकाळात किल्ल्याचे बांधकाम वाढवण्यासाठी नष्ट करून स्थलांतरित करण्यात आले होते. महालक्ष्मीची मूर्ती या समुद्रात पडलेल्या होत्या. वरळीचा बांध बांधताना त्या आढळून आल्या. याचा अर्थ हे मंदिर पूर्वी अस्तित्त्वात होते आणि नंतर ते नष्ट करण्यात आले. टॉलेमीने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात मुंबईला हॅप्टेनेशिया संबोधले. त्यानंतर चौथे शतक ते शिलाहार राजवटीचा शेवट होईपर्यंत मुंबई बेटेच पुरी म्हणून ओळखली जात होती. गुजरातच्या सुलतानाच्या काळात ती मानबाई झाली. या बेटांवर अराजक माजल्यावर ब्रिटिश येण्यापूर्वी तिला यमपुरी असे संबोधत असत. मुंबईत आजही प्राचीन वारसा जपणारी स्थळे आहेत; ज्यांच्यावर सखोल संशोधन होण्याची गरज आहे. अशा स्थळांची माहितीही या पुस्तकात मी संदर्भांसह दिली आहे,' असेही सोष्टे म्हणाले.
'गिनीज बुका'त नोंद
सिद्धार्थ सोष्टे यांची 'स्वप्नभूमी कोकण व पश्चिम घाट', 'नागस्थान ते नागोठणे' अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. २००७ मध्ये राजा शिवाजी डॉट कॉमतर्फे आयोजित 'फोर्ट् स ऑफ किंग शिवाजी' या पुण्यात झालेल्या गडांच्या छायाचित्र प्रदर्शनाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. त्यात सोष्टे यांची तीनशेहून अधिक छायाचित्रे होती.
मुंबईबाबत सर्वांनाच कुतूहल असतं. हे कुतूहल वाचनातून शमवून अनेकजण मुंबई आपल्याला कळली असा दावा करतात. परंतु केवळ पुस्तकी ज्ञानातून कळणारं हे शहर नाही, हे या शहरात वास्तव्याला आल्याखेरीज कळत नाही. परंतु वास्तव्यासाठी आल्यानंतरही अनेकजण मनानं मुंबईशी जोडली जातच नाहीत. खरं म्हणजे मुंबई आपली अनेक रूपं प्रसंगानुरूप दाखवते. अशा पद्धतीनं माणसांप्रमाणे 'सिच्युएशनल' वागणारं असं हे एकमेव शहर असेल भारतात!
कुतूहलातून कळलेली मुंबई
मुंबईला इतिहास नाही, मुंबई हे वसवलेलं शहर आहे आणि मुंबई ही केवळ व्यवसायासाठी एकत्र आलेल्या माणसांची वस्ती आहे, असे अनेक समज या शहराला चिकटलेले आहेत. असे अनेक गैरसमज चिकटलेलं शहरही मुंबईखेरीज अन्य दुसरं सापडणं विरळाच. अशा मुंबईची भुरळ अनेक शतकांपासून विविध लेखकांना पडली आहे. प्रत्येक लेखकानं त्याला दिसलेली, भावलेली मुंबई आपल्यापुढे उभी केली आहे. मुंबईच्या प्रेमात पडलेल्या अशाच एक लेखिका मधुवंती सप्रे.
नीलम आणि दिनेश या जोडप्याच्या संवादातून, त्यांच्याकडे येणाऱ्या नातलगांबरोबर झालेल्या संवादांतून तसंच या नातलगांची वास्तपुस्त करताना मुंबईबद्दल नीलमने सांगितलेली माहिती आणि कोकणातून आलेल्या नीलमने कुतूहलापोटी जमवलेली मुंबईची माहिती, अशा वेगवेगळ्या प्रकारे मुंबई वाचकांसमोर उलगडत जाते. कौटुंबिक संवादांतून मुंबईचा इतिहास कळत गेल्यामुळे पुस्तक वाचताना रंजक होऊन जाते. माहिती देणं हा पुस्तकाचा उद्देश असला, तरी तो मुंबईबद्दलचा जिव्हाळा जपत साध्य होत असल्याने हे पुस्तक 'प्रिय मुंबई' या शीर्षकाशी कुठेच फारकत घेत नाही.
मुंबईचे पाण्याचे स्रोत, समुद्र, जलाशय, नद्या, धरणे यांची माहिती या पुस्तकात येते. मुंबईने देशाला दिलेले नेते, विचारवंत, तत्त्वज्ञ यांचीही माहिती सहजगत्या मिळते. मुंबईवर पुस्तक लिहायला घेतल्यावर लोकल हा मुद्दा डावलून चालतच नाही. त्याप्रमाणे या पुस्तकातही नीलमच्या प्रवासाच्या अनुभवांतून लोकलचे जग उलगडत जाते. मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर त्याची तत्परतेने दखल लेखिकेनं घेतली आहे. तत्कालीन सह पोलिस आयुक्त सदानंद दाते यांची यासंदर्भात घेतलेली मुलाखत हा या पुस्तकाचा परमोच्च बिंदु आहे.
प्रज्ञा हरणखेडकर यांनी समुद्रकिनारा, लोकवस्ती यांचा बॅकड्रॉप घेत मुंबईच्या निसर्गाची प्रतीकं दाखवत छान मुखपृष्ठ तयार केलं आहे. या पुस्तकातून मधुवंती सप्रे यांनी प्रिय मुंबई आणि तिचा सखा समुद्र या युगुलाचं चिरंतनत्व रंगवलं आहे.
प्रिय मुंबई
लेखिका : मधुवंती सप्रे
प्रकाशन : श्रीशब्दरत्न प्रकाशन
पृष्ठं : २००
किंमत : २५० रु.
सफर अनोळखी मुंबईची!
मुंबईतलं पर्यटन म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येते एक बस, त्यातले हौशे, नवशे आणि गवशे पर्यटक....त्यात दाखवली जाणारी गेट वे ऑफ इंडिया, म्युझियम, सीएसटी अशी नेहमीची ठिकाणं. पण या ठळक ठिकाणांपलीकडेही बरीच मोठी मुंबापुरी आहे. या अनोळखी मुंबापुरीची सफर घडवतात काही अवलिये... त्यांच्या नजरेतून दिसणारी मुंबई आणि त्या सफरी नेमक्या काय आहेत याबद्दल....
मुंबईचं किल्लेदर्शन
किल्ल्यांवर भटकंती करणं, हा अनेकांचा छंद असतो. पण मुंबईतल्या किल्ल्यांविषयी आपल्याला कितपत माहिती आहे? मुंबईत १०-११ किल्ले आहेत. हे आपल्याला माहिती आहे का? ९५टक्के मुंबईकरांना याची माहितीच नाही. म्हणूनच मुंबईच्या किल्ल्यांची सफर घडवण्यासाठी डॉ. मिलिंद पराडकर किल्ले सफर आयोजित करतात. गेली २५ हून अधिक वर्ष डॉ. पराडकर दुर्गभ्रमंती करतायत. त्यांनी प्राचीन भारतीय संस्कृती (AIC-Ancient Indian Culture) या विषयात एमए केलं आहे. पीएचडीसाठी 'प्राचीन भारतीय दुर्गशास्त्र आणि हिंदवी स्वराज्याच्या दोन राजधान्या, राजगड व रायगड - एक तुलनात्मक अभ्यास' या विषयावर प्रबंध लिहिला आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेलं ज्ञान लोकांनाही वाटावं या उद्देशातूनच डॉ. पराडकरांनी ही किल्ल्यांची सफर सुरू केली. ते म्हणतात, शाळेत असताना एकदा बाबासाहेब पुरंदरे यांचं भाषण ऐकलं होतं, तेव्हापासूनच ही गड-दुर्गांची गोडी लागली. नोव्हेंबर २०१४मध्ये त्यांनी या सफरीला सुरुवात केली आणि आज तीन महिन्यात त्यांच्या ६-७ सफरी झाल्या आहेत. प्रत्येकवेळी साधारण ५०-६० नागरिकांचा चमू ते नेतात. मुंबईकरांना आपल्या शहराची, वारशाची ओळख करून द्यावी, यासाठी असलेल्या या सफरीमध्ये सकाळी ७.३० ते संध्याकाळी ७ या वेळेत मुंबईतले ६-७ किल्ले दाखवले जातात. अगदी प्राचीन काळापासून दुर्ग ही संकल्पना कशी विकसित होत गेली, शिवचरित्र, मराठ्यांचं राज्य, त्यांचे किल्ले, जगभरातल्या तसंच भारतातल्या किल्ल्यांचं वैशिष्ट्यं, दुर्गांचे प्रकार अशी सगळी माहिती दिली जाते. मध्यंतरी त्यांनी मातोश्री विद्यामंदिर, मानखुर्द या शाळेच्या विद्यार्थ्यांना ही सफर घडवली. discover.horizon@gmail.com
हेरिटेज वैभवाची ओळख
'मुंबईच्या हेरिटेज टूरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे'...श्रद्धा भाटवडेकर आपल्या खणखणीत आवाजात सर्वांचं स्वागत करते. त्यानंतर पुढचे दोन-तीन तास मुंबई शहराचे वैभव असलेल्या हेरिटेज इमारतींची माहिती ऐकण्यात सर्वजण रंगून जातात. गेल्या आठ-नऊ वर्षांपासून श्रद्धा मुंबईतील हेरिटेज वॉक घेते. इतिहास हा विषय घेऊन तिने रुईया कॉलेजमधून पदवी घेतली. पुढे पुण्यातून आर्किऑलॉजी हा विषय घेऊन तिने एमए करून 'बॉम्बे हेरिटेज वॉक' या संस्थेमध्ये तिने प्रशिक्षण घेतले. मुंबईत भरणाऱ्या काळा घोडा फेस्टिवलमध्ये तिने पहिल्यांदा लोकांसाठी हेरिटेज वॉक केला. सुरुवातीला संस्थेच्या वॉक्समध्ये ती मार्गदर्शन करीत असे. त्यानंतर तिने स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली. आता अनेक संस्था, कंपन्या, शाळा-कॉलेजं तिच्याकडे हेरिटेज वॉकसाठी संपर्क साधतात. काही नकाशे, जुने फोटो यांची मदत घेत ती मुंबईचा इतिहास उलगडून दाखविते.
मुंबईतील ब्रिटिशकालीन वास्तूंची ओळख, मुंबईतली वस्तुसंग्रहालये, एलिफंटा-कान्हेरी-महाकाली गुंफा अशा काही वैशिष्ट्यपूर्ण सफर ती घडवते. जाता-येता नेहमी पाहत असलेल्या ठिकाणांची आणि अजिबातच ठाऊक नसलेल्या ठिकाणांची माहिती देण्याचा तिचा प्रयत्न असतो. कॉर्पोरेट कंपन्या, परदेशी पाहुणे, कॉलेजचे विद्यार्थी यांच्यासाठी तिने आजवर हेरिटेज वॉक्स केले आहेत. इतकेच नव्हे, तर काही सामाजिक उपक्रमाअंतर्गत, अनाथाश्रमात राहणाऱ्या मुलांनाही तिने वॉकच्या माध्यमातून मुंबईची ओळख करून दिली आहे. लोकांच्या मनामध्ये हेरिटेजबाबत रस निर्माण करणे हा माझा मुख्य हेतू असल्याचे ती सांगते. 'या वॉक्सना खूप चांगला प्रतिसाद मिळतो. ही टूर संपल्यानंतर, आपल्याला खूप काही नवीन गवसले अशी भावना विद्यार्थ्यांची असते. आम्ही मुंबईकर आहोत, पण हे आम्हाला माहीतच नव्हते असेही अनेकजण सांगतात. त्यावेळी खूप समाधान वाटते,' असे श्रद्धा सांगते. shraddha.6886@gmail.com
धारावीची अनोखी सफर
धारावी ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. पण त्यापलीकडे जाऊन बघितलं तर सगळ्यात मोठी लघुउद्योगाची बाजारपेठसुद्धा याच धारावीमध्ये आहे. लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर व्हावे आणि त्यांना तिथल्या लोकांच्या जगण्याचा, त्यांच्या कामाचा अंदाज यावा यासाठी आठ वर्षांपूर्वी 'रिअॅलिटी टूर्स आणि ट्रॅव्हल्स' यांनी धारावी टूर ही संकल्पना सुरू केली. थोडक्यात टूर, विस्तीर्ण टूर आणि आसपासचा भाग अशा तीन भागात असलेल्या या टूरमध्ये संपूर्ण धारावी आपल्या नजरेखालून जाते.
काय दाखवले जाते
१ कम्युनिटी सेंटर - याठिकाणी धारावीच्या मुलांना कम्प्युटर आणि इंग्रजीचे धडे दिले जातात. या टूरच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम या सेंटरला फंड म्हणून दिली जाते. २ रिसायकलिंग - संपूर्ण जगभरातून आलेल्या भंगाराचं इथे एकत्रीकरण केलं जातं आणि त्यातल्या वापरण्याजोग्या वस्तू वेगळ्या काढून त्यांचं पुनरुज्जीवन केलं जातं. ३ बिस्कीट बेकरी - अख्ख्या मुंबईत खाल्ली जाणारी बिस्कीटं याच ठिकाणी बनतात. ४ पापड उद्योग - धारावीच्या काही भागातल्या स्त्रिया एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात पापड उद्योग चालवतात. ५ धारावीतली घरं - एकाला एक लागून असलेल्या झोपड्या हे धारावीचं वैशिष्ट्य या टूरमध्ये बघायला मिळतं. ६ कुंभारवाडा - सुमारे बाराशे कुटुंब असलेल्या या भागात निरनिराळ्या आकाराची मडकी आणि मातीच्या वस्तू बनवल्या जातात.
धारावी टूर या निराळ्या संकल्पनेबद्दल बोलताना 'रिअॅलिटी टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे टूर मॅनेजर आसीम अबिद शेख सांगतात की, 'धारावीबद्दल लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. पण दुर्दैवाने भारतीय पर्यटक याकडे दुर्लक्ष करतात. इथे भेट देणारी ९५ टक्के मंडळी ही परदेशातली असतात. त्यांना धारावीबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते. आता हळूहळू भारतीय पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे.' www.realitytoursandtravel.com
कुरकुरीत टूर (वडा पाव स्पेशल)
वडापाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण. गरमागरम बटाटे वडे तळताना दिसले की कुठल्याही अस्सल मुंबईकरचे पाय तिथं वळले नाहीत तरच नवल. मग अशात जर याच चटपटीत महाराष्ट्रीय खाद्यपदार्थाची सफर घडवून आणली तर? या नवीन वर्षांत ब्ल्यूबल्ब.इन आणि अभिषेक सडेकर या तरुण फूड ब्लॉगर यांनी एकत्र येऊन 'वडा पाव टूर' ही टूर सुरू केली आहे.
मुंबईच्या प्रसिद्ध बाबू वडापाव स्टॉलपासून या टूरची सुरुवात होते. तीन वेगळ्या पद्धतीचे वडापाव खायला मिळतात. या फूड वॉकनिमित्त पर्यटकांना तळलेल्या मिर्च्यांसोबत दिली जाणारी हिरवी-लाल चटणी कशी बनते इथपासून ते विले-पार्ल्याच्या इतिहासापर्यंत अशी अनेक प्रकारची माहिती मिळते. या टूरमध्ये वडापाव केवळ बघायलाच नाही तर स्वतःच्या हातानं बनवताही येतो. टूरच्या अखेरीस वडापावच्या ज्ञानासोबतच तुमचं पोट तीन चविष्ट वडा पाव, दोन महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ आणि पियुष/कोकम किंवा आवळा सरबत या गोष्टींनी तुडुंब भरलेलं असेल, याची हमी अभिषेक देतो. अडीच तासांची ही सफर खादाड/अस्सल खवय्यांसाठी निश्चितच पर्वणी ठरेल. दोन किलोमीटरची ही सफर दर शनिवारी दुपारच्या वेळेत घेतली जाते.
http://www.bluebulb.in/vada-pav-food-walk-mumbai.html
एक सफर सायकलची
स्वप्नाली धाबुगडे 'ट्रेकलव्हर्स' या ट्रेकिंग ग्रूपमधली एकमेव मुलगी. गडकिल्ले आणि भटकंतीची आवड असलेला हा ग्रूप अनेक वेगवेगळे उपक्रम राबवायचा. त्यातूनच सायकलिंगची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. दिवसा ट्रॅफिकमुळे मुंबईत सायकलिंग करणं शक्य नव्हतं, मग रात्रीचं सायकलिंग करायचं ठरलं. मुंबईची ओळख असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरून ही सायकल सफर करायचं ठरलं. गेट वे ऑफ इंडियापासून या सफरीचा सुरुवात होते. रात्री १० वाजता सगळे एकत्र भेटतात. मग तिथल्याच एका दुकानातून प्रत्येकाला सायकल दिली जाते, सोबत खाद्यपदार्थांचं एक पॅकेटही मिळतं. रजिस्ट्रेशन झाल्यावर सफर सुरू होते. गेटवेवरून मरिन ड्राइव्ह मग वरळी, प्रभादेवी, शिवाजी पार्क, गिरगाव चौपाटी आणि मरिन ड्राइव्हवरचा सूर्योदय पाहून सफरीची सांगता असा कार्यक्रम असायचा. प्रत्येक सायकलीला नंबर दिले जायचे. सुरुवातीला मरिन ड्राइव्ह, मग वरळी आणि मग शिवाजी पार्क अशा ठिकाणी या फिरत्या चाकांना एक ब्रेकही लागायचा. या ब्रेकमध्ये थोडी विश्रांती तर व्हायचीच, पण आपले सहकारी एकमेकांपासून जवळ आहेत ना, याची चाचपणीही व्हायची. स्वप्नाली आणि तिची टीम ही सायकल सफर फेब्रुवारी-मार्च आणि सप्टेंबर-ऑक्टोबर या दरम्यान वर्षातून साधारण दोनवेळा आयोजित करते. आताही फेब्रुवारी-मार्चसाठीच्या सफरीचं त्यांचं नियोजन सुरू आहे.
हेरिटेज यादीतील काही ठिकाणे
मंत्रालय, आयकर भवन, पोलिस मुख्यालय, धोबीघाट, स. का.पाटील उद्यान, मंगलदास कपडा बाजार, गिरगाव चौपाटी, भायखळ्याची लव्ह लेन, पारसी कॉलनीचा परिसर, वडाळ्याचे हनुमान मंदिर, कान्हेरी, जोगेश्वरी, महाकाली गुंफा, पवई तलाव, विहार, तुळशी धरणासह गिरणगावातील हबिब मन्झील, तोडीवाला मॅन्शन, भारतमाता थिएटर, तेजुकाया मेन्शन, आनंदजी लढ्ढा चाळ, बटाटावाला मॅन्शन, गणेश गल्ली मैदान, शिवाजी पार्कचा परिसर, बीडीडी चाळीचा परिसर,आक्साव्हिलेज, मार्वे गाव, मढ गाव, मनोरी, गोराई गाव
मुंबईचे ‘किल्ले’दार
किल्ले म्हटलं की रायगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड अशी नावं चटकन डोळ्यांसमोर येतात. पण मेट्रोसिटी मुंबईमध्येही ऐतिहासिक महत्त्व असणारे काही किल्ले आहेत. बऱ्याचशा मुंबईकरांना याची कल्पनाही नाही. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत या शहरातल्या किल्ल्यांचा एक दौरा करायला काय हरकत आहे?
उन्हाळी सुट्टी लागली लागली की मग कुठे ना कुठे भटकंतीचे बेत ठरू लागतात. कुणाच्यातरी डोक्यात ट्रेकची कल्पना येते. उन्हाळ्यात ट्रेक्स तसे कमी होत असले तरी उपलब्ध पर्यायांमधले वेगवेगळे पर्याय चाचपून पाहिले जातात. मुंबई-पुण्याजवळचे बहुतेक किल्ले आपल्याला ठाऊक असतात. कधी ना कधी फिरण्याच्या निमित्तानं किंवा ट्रेकच्या नमिित्तानं तिथं जाऊनही आलेलो असतो, पण आपण ज्या महानगरी मुंबईमध्ये राहतो त्या मुंबईमध्येही काही किल्ले आहेत हे अनेकांना माहितही नाही. मुंबईत जे किल्ले आहेत ते सध्या बऱ्यापैकी अवस्थेत आहेत.
मुंबईमधील किल्ल्यांचा आणि शिवरायांचा तसा काही संबंध नाही. मुंबई बेटाच्या रक्षणासाठी हे किल्ले बांधले ते इंग्रजांनी आणि त्या अगोदरच्या पोर्तुगीजांनी. एका दिवसात सहज भेट देता येऊ शकेल अशा मुंबईच्या काही किल्ल्यांवर या लेखातून नजर टाकण्याचा हा एक प्रयत्न आहे. विशेष म्हणजे यातले बहुतांश किल्ले अगदी भर वस्तीत आहेत.
वरळीचा किल्ला
साधारण १६७५ साली बांधलेला हा किल्ला अगदी दुरूनही सहज नजरेत भरतो. मात्र किल्ल्यावर जायचं तर वरळी कोळीवाड्यातल्या शेकडो घरांची रांग ओलांडावी लागते. कुठे चुकत चुकत, तर कुठे किल्ल्यावर जायचा रस्ता विचारात आपण थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशीच येऊन थबकतो. मुंबईमध्ये असलेल्या किल्ल्यांपैकी सर्वात सुस्थितीत असलेला हा किल्ला आहे. आजुबाजूच्या परिसरातले रहिवासी किल्ल्याची आणि किल्ल्यात असलेल्या मंदिराच्या स्वच्छतेची अगदी नीट काळजी घेतात. किल्ल्यावरून समोरच्या वांद्रे-वरळी सी लिंकचा अगदी अप्रतिम नजारा दिसतो.
शिवडीचा किल्ला
शिवडीची खाडी आता फ्लेमिंगो आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. पण याच खाडीजवळ असलेला हा शिवडीचा किल्ला मात्र तेवढा उपेक्षित राहिला आहे. वडाळ्याचं मुंबई पोर्ट ट्रस्टचं हॉस्पिटल ओलांडून शिवडीकडे जाताना बीपीसीएल कॉम्प्लेक्सच्या जवळच या किल्ल्यात जाण्याचा रस्ता आहे. मुख्य रस्त्यापासून किल्ल्याचं प्रवेशद्वार थोडं आतल्या बाजूला असल्याने बाहेरून, इथं किल्ला आहे असं लक्षात येत नाही. साधारण १६८०च्या आसपास बांधलेल्या या किल्ल्यात पायऱ्यांचे जिने असलेलं जुनं बांधकाम भक्कमपणे उभं असलेलं आजही पाहायला मिळतं.
वांद्र्याचा किल्ला
वांद्र्याचा प्रसिद्ध बँडस्टँड ओलांडून पुढे गेलं की ताजच्या पंचतारांकित हॉटेलपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला. अगदी समुद्रकिनारी वसलेला असल्यानं इथे येणं हा छान अनुभव असतो. किंबहुना म्हणूनच प्रेमी युगुलांनी हा किल्ला कायम भरलेला असतो. वरळीच्या किल्ल्यातून दिसणाऱ्या सी लिंकच्या बरोबर दुसऱ्या टोकाला हा किल्ला आहे. १६४०च्या सुमारास पोर्तुगीजांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं होतं. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरचा पोर्तुगीज भाषेतला शिलालेख अगदी ठळकपणे नजरेत भरतो. केस्टेला डी अग्वादा हे या किल्ल्याचं पोर्तुगीजकालीन नाव आहे.
धारावी अर्थात काळा किल्ला
सायनच्या किल्ल्याच्या अगदी समोरच दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हा धारावीचा काळा किल्ला आहे. आजुबाजूला पसरलेल्या झोपड्यांमधून माग काढत या किल्ल्यापर्यंत पोहोचावं लागतं. किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याला आत जाण्यासाठी प्रवेशद्वारच नाहीय. किल्ल्यामधले लोक त्या काळी आत वा बाहेर जाण्यासाठी शिडीचा वापर करीत असत. किल्ल्याच्या तटबंदीला शिडी लावली की त्या शिडीवरून आत-बाहेर ये जा करता येत असे. शत्रूचं आक्रमण झाल्यास, ती शिडी काढून घेतली की शत्रूला किल्ल्यामध्ये येणं अशक्य होऊन बसेल अशी यामागची कल्पना. किल्ल्याच्या संरक्षणाचा हा एक वेगळाच नमुना इथे बघता येतो. या किल्ल्याच्या मधोमध एक भुयारही आहे. किल्ल्याच्या एका तटबंदीवर इंग्रजी भाषेतला शिलालेख असून त्याचं नीटपणे जतन होणं आवश्यक आहे. इ. स. १७३७ च्या आसपास बांधलेल्या या किल्ल्याचा रीवा किल्ला असाही उल्लेख आढळतो.
शीव अर्थात सायनचा किल्ला
मुंबईमध्ये असलेल्या किल्ल्यांमधला हा एकमेव असा किल्ला जिथे पायऱ्या चढून जावं लागतं. डोंगरावरचा किल्ला म्हणजेच गिरिदुर्ग. सायन बस स्थानकाच्या अगदी समोरच असलेल्या छोट्याशा टेकडीवर बांधलेला हा किल्ला आहे. सायनच्या सरकारी उद्यानातून थोडं पुढे गेलं की अगदी खडकातच कोरलेल्या साधारण पस्तीस-चाळीस मजबूत दगडी पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून वर गेल्यावर किल्ल्याचे काही भग्नावशेष आजही आपल्याला त्याच्या भक्कमतेची जाणीव करून देतात. किल्ल्यावरून सभोवार नजर टाकली की सिमेंट-क्राँक्रीटचं अवाढव्य जंगल नजरेत भरतं. साधारण १६६९ साली इंग्रजांनी हा किल्ला बांधल्याची नोंद सापडते. सायक हिललॉक फोर्ट हे या किल्ल्याचं आणखी एक नाव.
वेरूळ लेणींचा इतिहास टॅब्लेटवर
वेरूळ लेणी पाहताना गाइड मिळाला नाही तर चिंता करू नका. आता लेणींचा इतिहास पर्यटकांना टॅब्लेट संगणकाच्या माध्यमातून दृकश्राव्य स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरुवातीला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि जपानी या चार भाषांत ही माहिती उपलब्ध असेल. लवकरच त्यात तेलुगू, जर्मन, चिनी या भाषांची भर पडणार आहेत. येत्या ८ ते १० दिवसांत पर्यटकांना टॅब्लेट उपलब्ध होतील.
वेरूळ लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक येतात. विदेशी पर्यटक येथे केवळ शिल्प पाहतात. भाषेच्या अडचणींमुळे त्यांना लेणीच्या इतिहासाची माहिती मिळत नाही. त्यामुळे पर्यटकांपर्यंत लेणीची ऐतिहासिक माहिती पोचविण्याचा टॅब्लेटच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. सुरुवातीला ही सोय प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी वेरूळ लेणी येथे सुमारे १० टॅब्लेट उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या मराठी, इंग्रजी, हिंदी आणि जपानी भाषेतील माहिती टॅब्लेटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच त्यात तेलुगू, जर्मन, चिनी भाषांचाही समावेश केला जाणार आहे.
६० रुपयांत मोबाइल अॅप
वेरूळ येथील माहिती टॅब्लेटवर उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर पर्यटकांसाठी मोबाइल अॅपही लवकरच विकसित करण्यात येणार आहे. अॅप केवळ ६० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. वेरूळला भेट देऊन गेल्यानंतरही पर्यटकांना या लेण्या पाहण्याचा अनुभव अॅपच्या माध्यमातून घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिली.
असा केला जाईल टॅब्लेट संगणकाचा वापर
लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना सुरुवातीला लेणीजवळ इअर फोनसह हा टॅब्लेट देण्यात येईल. पर्यटकांना टॅब सुरू केल्यावर भाषेचा पर्याय निवडावा लागेल. त्यांनी निवडलेल्या भाषेत लेणीचा क्रमांक, फोटोसह लेणीची संपूर्ण माहिती, इतिहास, शिल्पाचे महत्त्व, आकार, लेणी पाहण्यासाठीचा एकूण लागणारा वेळ, लेणीचा संपूर्ण नकाशा, सध्या आपण कोणती लेणी पाहत आहोत, याची माहिती दृकश्राव्य स्वरुपात उपलब्ध असेल. टॅब्लेटचे भाडे लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.
इतिहास : मुंबई बेटावरचा ब्रिटिश किल्ला
वर उल्लेख केलेल्या मुंबईच्या सात बेटांपैकी फक्त मध्ये असलेले मुंबई बेट क्षेत्रफळाने मोठे होते.
निर्मिती आणि अखेर
१६६५ पासूनची ब्रिटिशकालीन मुंबई आणि आजची मुंबई यातल्या जमीनअस्मानाच्या फरकांचा नकाशांच्या साहाय्याने अभ्यास करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखकाने केला आहे.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या सात बेटांच्या समूहाने म्हणजे मुंबईने शेकडो वर्षांपासून देशी व परदेशी राज्यकर्त्यांना आकर्षित केले होते. कुलाबा-धाकटा कुलाबा- मुंबई- माझगांव- परळ- वरळी व माहीम अशा या सात बेटांवर मूळ वस्ती फक्त कोळी, भंडारी व आगरी लोकांची होती. गुजराथमधील चंपानेरमधून दक्षिणेकडील प्रदेश जिंकत जिंकत येथवर आलेल्या राणा प्रताप बिंबाने मोक्याच्या माहीम बेटावर इ.स. ११४० ते १२४१ दरम्यान मोठा मजबूत दगडी किल्ला बांधला. त्यानंतर इ.स. १३४८ मध्ये येथे घुसलेल्या मुगलांनी काही व १५३४ मध्ये मोगलांना हटवून मुंबई बळकावलेल्या पोर्तुगीजांनी काही बेटांवर किल्ले बांधले. मात्र नंतर त्यांनी राजघराण्यांतील सोयरिकीमुळे मुंबई बेट ब्रिटिशांना १६६१ मध्ये आंदण दिले व ते प्रत्यक्ष हस्तांतरित होण्याची प्रक्रिया १६६५ मध्ये पूर्ण झाल्यावर येथे आधी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा व नंतर यथावकाश इंग्लंडच्या राणीचा राज्यकारभार सुरू झाला. मुंबईचे खरे महत्त्व ब्रिटिशांनीच ओळखले होते.
41-lp-fort-mumbai
वर उल्लेख केलेल्या मुंबईच्या सात बेटांपैकी फक्त मध्ये असलेले मुंबई बेट क्षेत्रफळाने मोठे होते. त्यामुळे त्यावर वस्ती करणे ब्रिटिशांना जास्त सोयीचे होते. येथूनच वस्ती व कारभार करताना त्यांनी प्रशस्त व प्रचंड मोठा किल्ला येथे उभारला. तथापि काही काळानंतर त्यांनीच तो पाडूनही टाकला. आज त्याच किल्ल्याबद्दल काही माहिती मिळवू या.
या माहितीचा मागोवा घेताना लक्षात आलेली विशेष गमतीदार गोष्ट अशी की, किल्ल्याच्या निर्मितीचे प्रयोजन आणि दोनशे वर्षांनंतर तो पाडण्याचा निर्णय या दोन्ही गोष्टींशी संबंधित असलेला विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळा मराठे वंशज यांचा, स्वत:ला जगज्जेता म्हणविणाऱ्या ब्रिटिशांनी घेतलेला धसका!
इ. स. १६१२ मध्ये ब्रिटिशांनी सुरत येथे वखारी स्थापन केल्या व तेथून समुद्रमार्गाने त्यांचा व्यापार सुरू झाला. तेथे राज्य मोगलांचे होते. नाशिक येथे देवदर्शनासाठी आलेल्या शिवाजी महाराजांच्या चुलतीला मोगलांच्या टोळीने पळवून नेले. त्यांचा पाठलाग करून शिवाजी महाराजांनी चुलतीला सोडवून आणले (नोव्हेंबर १६६३) व या आगळिकीची मोगलांना अद्दल घडविण्याकरिता मोजक्या मावळ्या घोडेस्वारांसोबत दौडत जाऊन जानेवारी १६६४ मध्ये सुरतेमधील सर्व मोगलांना लुटून साफ केले. महाराजांच्या सक्त ताकिदीमुळे वखारीमधील ब्रिटिशांना मावळ्यांनी हातही लावला नाही. परंतु ब्रिटिशांनी मराठय़ांचा धसका मात्र घेतला. सुरत व मुंबई या दोन्ही ठिकाणी त्यांचे गव्हर्नर नेमलेले असत. त्यांच्या राणीबरोबरच्या तत्कालीन पत्रव्यवहारामध्ये हा धसका स्पष्टपणे व्यक्त झालेला दिसतो.
मुंबई बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर इ.स. १५३८ च्या आसपास ज्याला मुंबई बेट पोर्तुगीजांनी भाडय़ाने दिले होते, त्या मार्सिया दा ओर्ता या शास्त्रज्ञाने मॅनॉर हाऊस या नावाचा बंगला बांधला. त्या बंगल्यात १६२६ नंतर पोर्तुगीज गव्हर्नर राहात असे. नंतर १६६५ मध्ये तेथे ब्रिटिश गव्हर्नर राहाण्यास आला. त्याने, म्हणजे हम्फ्रेकूकने, मॅनॉर हाऊसभोवती तटबंदी करून घेतली व त्यावर अठरा तोफा बसवल्या. त्याला ‘बॉम्बे कॅसल’ असे नाव दिले. हा ब्रिटिश राज्यकारभाराचा त्या काळातील मुख्य पत्ता होता. ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर जॉर्ज ऑक्झेंडन (नियुक्ती १६६८) व नंतर जिराल्ड आँजियर (१६७२) हे सुरत व मुंबई दोन्ही ठिकाणांचा कारभार पाहात.
42-lp-fort-mumbai
दि. ३, ४ व ५ ऑक्टोबर १६७० साली शिवाजी महाराजांनी सुरत दुसऱ्यांदा लुटून साफ केली. त्यानंतर मात्र ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांची हायच खाल्ली. १७१५ मध्ये नियुक्ती झालेल्या चार्ल्स बून या गव्हर्नरने तोपर्यंत विस्तारलेल्या शहराभोवती उंच, रुंद व भक्कम भिंती बांधून त्याला किल्ल्याचे स्वरूप आणले. या किल्ल्याच्या पूर्व बाजूस समुद्र असल्याने तेथून दोन दरवाजे होते, त्यांना मरीन गेट असे म्हणत. उत्तरेच्या भिंतीत, दक्षिणोत्तर बझारगेट स्ट्रीटच्या उत्तर टोकास बझारगेट या नावाचा तिहेरी दरवाजा होता. त्याला तीन दरवाजा असेदेखील म्हणत. पश्चिमेकडील भिंतीमध्ये टाऊन हॉलजवळील सेंट थॉमस चर्चकडून सरळ पश्चिमेस जाणाऱ्या रस्त्यावर तो दरवाजा होता, त्याला चर्चगेट असे नाव होते व त्या रस्त्याला चर्चगेट स्ट्रीट असे म्हणत. किल्ल्याबाहेर पडल्यावर हीच चर्चगेट स्ट्रीट पुढे पश्चिमेकडे गेल्यावर इ.स. १८६७-७२ च्या आसपास उत्तरेकडून आलेल्या व कुलाब्यापर्यंत जाणाऱ्या बीबीसीआय रेल्वेला तिने जेथे छेदले तेथील स्टेशनला चर्चगेट असे नाव दिले व तेच अजून प्रचारात आहे. मूळचा चर्चगेट दरवाजा कधीच इतिहास जमा झाला! चर्चगेट स्ट्रीटने रेल्वेला जेथे छेदले तेथे लेव्हल क्रॉसिंग होते. रेल्वे कुलाब्यापर्यंत जात होती व शेवटचे स्टेशन ही फार देखणी इमारत होती. १९३० नंतर रेल्वे चर्चगेटपुढचे कुलाब्यापर्यंतचे रूळ तोडले, १९३७ मध्ये कुलाबा स्टेशन पाडले व स्टेशनच्या जागेत १९५० नंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांसाठी फ्लॅट्स बांधून ‘बधवार पार्क’ निर्माण केले.
किल्ल्याच्या दक्षिणेकडील भिंतीमध्ये टाऊन हॉलकडून सरळ दक्षिणेस आलेल्या अपोलो स्ट्रीटच्या टोकाशी ‘अपोलो गेट’ या नावाचा दरवाजा होता. आता तेथेच आसपास पूर्वेस ‘रॉयल सेलर्स होम’ म्हणजे पोलीस मुख्यालय आहे. अपोलो गेटच्या दक्षिणेस बाहेर पडल्यावर कुलाबा बेटापर्यंत समुद्रच होता. तेथे भरतीच्या वेळी अपघाताने बुडून अनेक सैनिक मारले गेल्यामुळे तेथून ससून डॉकपर्यंत समुद्रात भर घालून कुलाबा बेटाला जोडणारा कुलाबा कॉजवे १८३८ मध्ये पूर्ण केला.
आक्रमणाच्या भीतीमधूनच या किल्ल्याची, म्हणजे फोर्टची निर्मिती झाली. तरीही मराठय़ांचा धसका होताच! चिमाजी आप्पा पेशवे यांनी १७३९ मध्ये चढाई करून पोर्तुगीजांना हरवून वसईचा किल्ला जिंकला. ही बातमी आल्याबरोबर इथे ब्रिटिशांनी मुंबई फोर्टच्या दक्षिणेच्या अपोलो गेटपासून पश्चिमेच्या चर्चगेटपर्यंत व तेथून उत्तरेस जाऊन बझारगेटच्या पूर्वेस समुद्रकिनाऱ्यापर्यंत, असा ३० फूट रुंद व २० फूट खोल सलग खंदक खणण्यास ताबडतोब सुरुवात केली! बाहेरून दौडत आलेल्या शत्रूच्या घोडेस्वारांना झेप टाकून ओलांडणे कठीण व्हावे म्हणून ३० फूट रुंदी! परिचितांना फळ्या टाकून आणले किंवा सोडले जाई. ‘ऑपरेशन चिमाजी आप्पा’च्या प्रभावामुळे, पोर्तुगिजांनी १५८० मध्ये बांधलेला शिवच्या टेकडीवरील किल्लाही लगेच दुरुस्ती करून मजबूत केला गेला आणि पूर्व तटावर शिवडीचा किल्लाही लगेच बांधला गेला (इ.स. १७६८). मुंबई किल्ल्याभोवतीचा खंदक खणून १७४३ मध्ये पाण्याने भरला.
43-lp-fort-mumbai
मुंबई फोर्टला एकूण आठ बुरुज होते. वर उल्लेख केलेल्या तीनही गेट्स्मधून सूर्योदयाला फोर्टबाहेरील लोकांना व कर्मचाऱ्यांना आत येऊ दिले जाई. दिवसभराच्या कामानंतर सूर्यास्त होण्यापूर्वी त्यांनी बाहेर जाणे आवश्यक असे व सूर्यास्तास गेट्स् बंद केले जातात. कोणत्याही कारणाने कुणीही या गेट्स्मधून छत्री उघडून अथवा पेटता कंदील हातात घेऊन जाणे हा गुन्हा मानला जाई असा उल्लेख आहे!
मुख्य किल्ल्याच्या ईशान्य कोपऱ्याच्या उत्तरेस किल्ल्याबाहेर सैनिकांसाठी सेंट जॉर्जेस् हॉस्पिटल बांधले होते. त्या हॉस्पिटलच्या भोवताली मूळ फोर्टला जोडून इ. स. १७६९ मध्ये ‘फोर्ट जॉर्ज’ हा छोटा फोर्ट बांधला. येथे याआधी डोंगरीचा किल्ला होता.
त्याच्या पूर्वेकडील भिंतीस लागूनच समुद्र होता व बोटी नांगरण्याची सोय होती. मोठय़ा फोर्टमध्ये राहाणारे ब्रिटिश अधिकारी व त्यांचे कुटुंबीय, परदेशी शत्रूचा हल्ला झाल्यास या छोटय़ा फोर्टमध्ये आश्रय घेतील व तेथून पूर्वेकडील बोटींमधून पेण किंवा पनवेल येथे पेशव्यांच्या आश्रयास जातील अशी योजना होती! मात्र तशी वेळ आली नाही. या फोर्ट जॉर्जच्या पूर्व भिंतीचा थोडासा भाग आजही उभा आहे. (छायाचित्र पहावे). त्यात शासनाची कार्यालये आहेत. तेथूनच मूळ किल्ल्यांत जाणारे भुयार आहे व ते स्वत: पाहिल्याचे मला स्व. प्रमोद नवलकर (‘भटक्याची भ्रमंती’चे लेखक) यांनी सांगितले होते. ब्रिटिश कुटुंबांच्या पलायन योजनेला या भुयाराने पुष्टीच मिळते.
सदर लेख लिहीत असताना, जनरल पोस्ट ऑफिसमध्ये एका भुयाराचा दरवाजा सापडल्याची बातमी वाचली. हा सेंट जॉर्ज फोर्टमधील भुयाराचा दुसरा दरवाजा असला पाहिजे.
पुनश्च मराठा प्रभाव!
१८१८ मध्ये पेशव्यांचा पाडाव झाला. त्यामुळे ब्रिटिशांना प्रबळ शत्रू उरला नाही. शिवाय मुंबईतील व्यापार व तिचे महत्त्व वाढत होते, त्यामुळे वस्ती पसरण्याची आवश्यकता होती. १८५५ मध्ये अपोलो गेटचा काही भाग व फोर्टची थोडी तटबंदी पाडली. पण १८६२ ला नियुक्ती झालेल्या सर बार्टल फ्रियर यांनी हुकूम दिला व १८६५ नंतर १८६७ पर्यंत फोर्टच्या सर्व तटबंदी पाडून सर्व खंदक बुजवून टाकले, तसेच नवे रस्ते तयार करून पूर्वीचे रस्ते रुंद करून शहराचे रूप बदलण्यास सुरुवात झाली. पूर्वी जेथे चर्चगेट उभा होता तेथेच १८६७ नंतर सुंदर ‘फ्रियर फाऊंटन’ उभारले, आता त्याचे नांव ‘फ्लोरा फाउंटन’ असे आहे. (नकाशा व छायाचित्र पाहावे)
ब्रिटिशांनी तयार केलेल्या ‘प्लॅन ऑफ फोर्ट अँड एस्प्लनेड ऑफ बॉम्बे, १८२७’ चा संदर्भ घेऊन, माझ्याकडील १९४२ ची मुंबई दाखवणाऱ्या नकाशावर मुंबई फोर्टचे अंदाजे अध्यारोपण केले आहे. ते पाहताना पूर्वीची मुंबई आणि नंतरची मुंबई यात हरवून जायला होते! तेव्हाच्या मुंबईची वर्णने म्हणजे सुरस आणि चमत्कारिक कथाच आहेत! फक्त या सुरस कथा ऐकण्यासाठी आणि मुंबईची ‘मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका’ ही पठ्ठे बापूरावांनी केलेली स्तुती ऐकून, कल्पनेने तेव्हाच्या मुंबईची दृश्ये नजरेसमोर आणण्यासाठी, आजच्या मुंबईभक्त वाचकांना वेळ पाहिजे!
(ऋ णनिर्देश- * Survey of India कृत Bombay Guide Map including Part of Salsotte, 1942. * Plan of The Fort and Esplanade of Bombay, 1827; * Bombay, The Cities Within ; * लेखक- शारदा द्विवेदी. राहुल मेहरोत्रा; * मुंबईची आभूषणे- सभोवतालचे किल्ले, लेखक- सुहास सोनावणे; * ‘शोध’ , लेखक- मुरलीधर खरनार.)
मुंबईच्या इतिहासाचा दुर्मीळ ऐवज
महाराष्ट्रातील इतर शहरांच्या इतिहासापेक्षा मुंबई शहराचा इतिहास वेगळा व मनोरंजक आहे.
महाराष्ट्रातील इतर शहरांच्या इतिहासापेक्षा मुंबई शहराचा इतिहास वेगळा व मनोरंजक आहे. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स व पोर्तुगालची राजकन्या कॅथरिन यांच्या वाङ्निश्चयानिमित्त पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई बेट १६६१ मध्ये आंदण दिले. ईस्ट इंडिया कंपनीकडे जेव्हा या बेटाचा ताबा आला तेव्हा या बेटाची अवस्था अत्यंत वाईट होती. सात वेगवेगळ्या बेटांचा समूह असलेल्या मुंबईत त्या काळात खाडय़ा व जमिनीवर खारे पाणी साठून मोठय़ा प्रमाणात रोगराई पसरत असे. त्यामुळे दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडत असत. इंग्रजांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतही मुंबईच्या विकासाला प्रारंभ केला. या विकासाचा प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीतून झाला. प्रथम इंग्रजांनी सात बेटांचा समूह असलेल्या मुंबईला एकसंध स्वरूप दिले. हळूहळू टप्प्याटप्प्याने मुंबई विकसित होत गेली. १९ व्या शतकाच्या अखेरीस मुंबई हे सुंदर वास्तुशैलीने नटलेल्या इमारतींचे समृद्ध शहर बनले. उद्योग व व्यापारात अग्रेसर असलेल्या या शहराने भारतातील प्रथम श्रेणीचे शहर होण्याचा मानही पटकावला.१९०९ साली ‘गॅझिटिअर ऑफ बॉम्बे सिटी अॅण्ड आयलँड’ हे मुंबईविषयक गॅझिटिअरचे इंग्रजी भाषेतील तीन खंड प्रकाशित झाले. या गॅझिटिअरच्या दुसऱ्या खंडातील, सातव्या विभागातील मुंबईचा इतिहास मराठीमध्ये आणण्याचे काम जयराज साळगावकर यांनी ‘मुंबई शहर गॅझिटिअर’ या ग्रंथाद्वारे केले आहे. त्यामुळे मराठी वाचकांना मुंबईचा इतिहास सहजसाध्य झाला आहे.
गॅझिटिअर म्हणजे महत्त्वाच्या सर्वसमावेशक माहितीवर आधारित असलेले जिल्ह्य़ाचे, शहराचे व प्रदेशाचे विश्वसनीय दस्तावेज होय. इंग्रजांनी भारतातील प्रत्येक जिल्ह्य़ातील जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या भागातील माहितीचे अहवाल मागवून, त्याचे संकलन करून गॅझिटिअर तयार केली. १८६८ मध्ये मुंबई सरकारने गॅझिटिअर समितीची स्थापना केली. मुंबई इलाख्यातील प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या जॉन कॅम्पबेल यांना मुंबई इलाख्याची गॅझिटिअर संपादित करण्याची जबाबदारी देण्यात आली. कॅम्पबेल यांनी मुंबई इलाख्याच्या गॅझिटिअरचे काम १८७४ ते १८८४ या काळात केले व मुंबई इलाख्यातील अनेक जिल्ह्य़ांचे गॅझिटिअर प्रसिद्ध केली. परंतु मुंबई गॅझिटिअरला मात्र मुहूर्त मिळाला नाही. जॉन कॅम्पबेल यांनी अत्यंत विस्तृत असलेल्या मुंबई गॅझिटिअरसाठी मोठय़ा प्रमाणात माहिती संकलित केली होती. परंतु दरम्यानच्या काळात कॅम्पबेल आजारी पडल्यामुळे त्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली व १८९८ मध्ये ते इंग्लंडला परत गेले. त्यामुळे मुंबई गॅझिटिअरचे काम लांबणीवर पडले.
एस. एम. एडवर्ड्स यांनी जॉन कॅम्पबेल यांनी संकलित केलेल्या मुंबई गॅझिटिअरमध्ये अनेक सुधारणा केल्या, तसेच या संकलनातील माहिती अद्ययावत व परिपूर्ण करण्यात आली. मुंबईतील अनेक अभ्यासकांकडून मुंबईविषयक माहितीची भर या गॅझिटिअरमध्ये घालण्यात आली. १९०९ मध्ये एस. एम. एडवर्ड्स यांनी संपादित केलेले ‘गॅझिटिअर ऑफ बॉम्बे सिटी अॅण्ड आयलँड’चे तीन खंड प्रकाशित करण्यात आले.
या जुन्या गॅझिटिअरची उपयुक्तता अद्यापि टिकून आहे. गॅझिटिअरमध्ये लोकसंख्या, अर्थव्यवस्था, इतिहास, चालीरिती, सण, समाजव्यवस्था, महत्त्वाची स्थळे इत्यादीची समग्र माहिती असते. महाराष्ट्र शासनाने ब्रिटिश काळातील गॅझिटिअरचे पुनर्मुद्रण केले आहे.
ब्रिटिश गॅझिटिअर दुर्मीळ असल्यामुळे मराठी वाचकांपर्यंत ती सहजगत्या पोहोचू शकत नव्हती. परंतु जयराज साळगावकरांच्या ‘मुंबई शहर गॅझिटिअर’ या ग्रंथामुळे आता वाचकांची ही गरज नक्की भागू शकेल. या ग्रंथात हिंदू कालखंड, मुस्लीम कालखंड व पोर्तुगीज कालखंड अशी पहिली तीन प्रकरणे असून, त्यानंतर ब्रिटिश कालखंडाची १६६१ ते १९०९ पर्यंतची एकूण सात प्रकरणे आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये मुंबईतील ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचा परामर्श घेण्यात आलेला आहे. हिंदू कालखंडाच्या प्रकरणामध्ये मुंबईतील प्राचीन काळातील मूळ रहिवाशी, तसेच नंतरच्या काळात मुंबईत स्थायिक झालेल्या जाती-जमातींची उद्बोधक माहिती आहे. विशेष म्हणजे आपण जो ‘अठरापगड’ शब्दप्रयोग वापरतो, त्या जाती-जमातींच्या ७२ पगडय़ांच्या माहितीसहित दुर्मीळ चित्रे या प्रकरणात आहेत. मुंबई बेटावर राज्य करणारे मौर्य, चालुक्य, शिलाहार इत्यादींचा सत्तासंघर्ष या ग्रंथात आहे. मुस्लीम कालखंडात मुस्लिमांच्या आक्रमणामुळे बेटावर झालेले बदल तसेच प्रार्थनास्थळे यांची माहिती आहे. पोर्तुगीज कालखंडात मुंबई बेटाची स्थिती, करपद्धती, जमीनदारी, तत्कालीन चर्च यांचा इतिहास आहे. १६६१ मध्ये पोर्तुगीजांकडून इंग्रजांना मुंबई बेट आंदण मिळाले. ईस्ट इंडिया कंपनीने येथे कारभार सुरू केल्यानंतर इंग्रजांना मुंबई बेटावर अनेक संकटांशी सामना करावा लागला. हळूहळू इंग्रजांनी या बेटावर आपली घडी बसवली. जेरॉल्ड अँजियर (१६७२-१६७७) या दूरदर्शी व धोरणी गव्हर्नरने मुंबई बेटावर न्यायसंस्था, संरक्षण व प्रजेच्या हिताची अनेक कामे केली. नंतरच्या काळात सिद्दी, मराठे, चाचे, मोगल, पोर्तुगीज यांचा उपद्रव मुंबईला सतत होत होता. हळूहळू मुंबईचा विकास सुरू झाला. मुंबईत जहाजबांधणीला सुरुवात झाली. न्यायालय, टाकसाळ, गोदी सुरू झाली. गव्हर्नमेंट हाऊस, कस्टम हाऊस, मरिन हाऊस अशा वास्तू उभ्या राहिल्या. समुद्रात व खाडय़ांमध्ये भराव टाकून अतिरिक्त जमीन उपलब्ध करण्यात आली. सात बेटांना जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. या साऱ्याचा तपशीलवार इतिहास मुंबई शहर गॅझिटिअरमध्ये आहे.
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या कार्यकाळात मुंबईत अनेक सुधारणा झाल्या. शिक्षणाचा प्रसार झाला. नंतरच्या काळात रुग्णालये व अनेक शैक्षणिक संस्था सुरू झाल्या. रेल्वेची सुरुवात झाली. बंदरांचा विकास झाला. व्यापार वाढला. बँका सुरू झाल्या. दलदलीच्या जमिनीवर भर टाकण्यात आली. समुद्र हटवून अतिरिक्त जमीन तयार करण्यात आली. अमेरिकन यादवी युद्धामुळे (१८६०-६५) मुंबईच्या कापसाला मागणी वाढली. पैशाचा ओघ मुंबईकडे वाहू लागला. मुंबईत आर्थिक सुबत्ता आली. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या कारकीर्दीत मुंबईत अनेक वास्तुशैलीतील दिमाखदार इमारती उभ्या राहिल्या. उद्याने, प्रशस्त रस्ते यामुळे मुंबईचे रूपच पालटले. अमेरिकन यादवी युद्धाच्या समाप्तीनंतर मुंबईत मंदीची प्रचंड लाट आली. या लाटेत मुंबईची अर्थव्यवस्था कोलमडली. परंतु थोडय़ाच काळात मुंबई सावरली आणि १९ व्या शतकाच्या अखेरीस ती पूर्वेकडील लंडन बनली! मुंबईच्या या साऱ्या इतिहासाचे ओघवते चित्रण ‘मुंबई शहर गॅझिटिअर’ या ग्रंथात आहे. मुंबईच्या या इतिहासाच्या जोडीला डॉ. जॉन फ्रेयर, ग्रँट डफ, गो. ना. माडगावकर, डॉ. कुन्हा, एस. एम. एडवर्ड्स, डॉ. एम. डी. डेव्हिड व इतर अभ्यासकांच्या ग्रंथांचे समग्र संदर्भ घेतल्यामुळे हा ग्रंथ अधिकच माहितीपूर्ण झाला आहे. या ग्रंथात मुंबई शहराची अनेक अत्यंत सुस्पष्ट व दुर्मीळ कृष्णधवल छायाचित्रे आहेत. या छायाचित्रांमुळे ग्रंथाचे सौंदर्य अधिक खुलले आहे.
या ग्रंथात माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनला दिलेली ‘इस्टुर फाकडा’ ही उपमा एल्फिन्स्टनच्या संदर्भातील नसून, ती वडगाव येथे झालेल्या इंग्रज-मराठा युद्धात धारातीर्थी पडलेल्या कॅप्टन स्टुअर्ट यांना दिली होती. तसेच एल्फिन्स्टनने महात्मा जोतिराव फुल्यांच्या सहकार्याने शैक्षणिक सुधारणा केल्याचे विधान योग्य नाही. कारण एल्फिन्स्टन व महात्मा फुल्यांचा कार्यकाल वेगवेगळा होता.
‘मुंबई शहर गॅझिटिअर’ हा मुंबई शहराच्या इतिहासाबद्दल असलेली वाचकांची उत्सुकता पूर्ण करणारा असा ग्रंथ आहे. ल्ल
‘मुंबई शहर गॅझेटिअर’- जयराज साळगावकर,
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,
पृष्ठे- २०७, मूल्य- २५० रुपये.
mumbai history in marathi
history of bombay
history of mumbai seven islands
history of mumbai in short
development of bombay city
history of mumbai in hindi
history of bombay under british rule
history of bombay in 18th century
No comments:
Post a Comment
Please do write your suggestions and thoughts.